जिल्ह्यातील सामाजिक संस्थेच्या लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग
लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणजे सामाजिक संस्था -डॉ. सुरेश पठारे
नगर (प्रतिनिधी)- लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणजे सामाजिक संस्था आहे. हा पाचवा स्तंभ मध्यभागी चारही स्तंभांना समतोल राखण्याचे काम करत आहे. देशाच्या जडणघडणीसाठी सामाजिक स्वयंसेवी संस्थांचा मोठा वाटा आहे. स्वयंसेवी संस्थांनी सकारात्मक सेवाभाव व बांधिलकी टिकवून समाजकार्य करण्याचे आवाहन सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी केले.
ज्ञानरचना सोशल फाउंडेशन, गुरु साई फाउंडेशन, आजीवन अध्ययन, विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सामाजिक संस्था क्षमता बांधणी कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. पठारे अध्यक्षीय भाषणात बोलत होते. याप्रसंगी ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी, प्रवीण साळवे, गुरु साई फाऊंडेशनचे संचालक तथा कार्यशाळेचे मार्गदर्शक सीए शंकर अंदानी, मार्गदर्शक सीए प्रसाद भंडारी, कवयित्री सरोज आल्हाट, नॅशनल पोस्टल एम्प्लॉईज असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष यादव, पत्रकार अनिल हिवाळे, मदत सोशल फाउंडेशनच्या ॲड. मोनाश्री अहिरे, सिंधी पंचायतचे महेश मध्यान आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे डॉ. पठारे म्हणाले की, सरकारला शक्य नाही, ते काम सामाजिक संस्था करत असतात. समाजातील अत्याचार, अन्याय दूर करण्यासाठी सातत्याने त्यांचा पुढाकार असतो. सामाजिक कार्य करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. मात्र त्याला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिशा मिळते. सेवाकार्य धंदा होऊ नये, यासाठी कायद्यानुसार नियमावली करुन त्या संस्था रजिस्टर करण्यात आल्या आहेत. स्वयंसेवी संस्थांना काम करण्यास मोठी संधी व आव्हान देखील असल्याचे त्यांनी सांगितले.
कठोर नियमावली असल्याने मनमानी पद्धतीने सामाजिक संस्थेचे चालू शकत नाही. रजिस्टर करणे, शासनाच्या योजना पदरात पाडून घेणे, विविध फंड मिळवणे यासाठी सखोल ज्ञान आवश्यक असून, या कार्यशाळेच्या माध्यमातून या संदर्भात दिशा मिळणार आहे. स्वयंसेवी संस्थांनी जे करतो ते कशासाठी करतो? संस्थेच्या कार्याचे स्पष्ट उद्देश व ध्येय समोर ठेवून कार्य केले पाहिजे. शासनाच्या नवनवीन गाईडलाइन व नियमावली माहिती करुन घेण्यासाठी अपडेट होण्याची गरज असल्याचे डॉ. पठारे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात सुप्रिया चौधरी यांनी सामाजिक संस्थांची माहिती देऊन ज्ञानरचना फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. महेश मध्यान यांनी समाजापर्यंत शासकीय योजनांचा लाभ घेऊन जाण्यासाठी व संस्थेच्या माध्यमातून काम करताना त्याचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक आहे. यामुळे योग्य दिशेने वाटचाल करता येणार आहे. यासाठी ही कार्यशाळा दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
सरोज आल्हाट म्हणाल्या की, समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी समाजसेवी संस्थेची गरज आहे. हे लक्षात घेऊन यामध्ये कार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधींना योग्य शिक्षण व मार्गदर्शनाची गरज आहे. या संस्था अधिक सक्षम झाल्यास ते समाजाला सक्षम करण्यासाठी कार्य करणार असल्याचे ते म्हणाले.
सीए शंकर अंदानी म्हणाले की, शासन विविध शासकीय योजना राबवीत असते, परंतु त्याचा लाभ शेवटच्या घटकांना मिळण्यासाठी शासन स्वयंसेवी संस्थांची मदत घेत असते. यासाठी संस्थेला महत्त्व असून काम कसे करावे? संस्थेचे-फायदे नुकसान?, कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. संस्थेचे उत्पन्न, कामकाज, ऑडिट, शासनाच्या योजनेचा लाभ, सीएसआर फंड सरकारी व खाजगी कंपन्यांकडून कसा मिळवावा? या संदर्भात मार्गदर्शन करुन स्वयंसेवी संस्थांची बांधणी करण्याचे या कार्यशाळेचे उद्दीष्ट त्यांनी स्पष्ट केले.
सीएसआरडीच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला जिल्हाभरातील सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाहुण्यांचे स्वागत प्रवीण साळवे यांनी केले. यामध्ये इन्कट टॅक्स कायदे, धर्मदाय आयुक्तांकडे संस्था नोंदणी प्रक्रिया व कायदे, संस्थांच्या विविध नोंदणी, सेक्शन 8 कायदा माहिती, सीएसआर निधी संकलन यावर मार्गदर्शन करण्यात आले. तर संस्थांच्या प्रतिनिधींच्या विविध प्रश्न व शंकांचे निरसन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या स्वयंसेविका उषा तांबे, प्रियंका देवतरसे, सुजाता अंगारखे, कविता हजारे, योगिता काळे, सीएसआरडी कॉलेजचे प्राध्यापक सॅम्युअल वाघमारे, प्रदीप जारे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा तांबे यांनी केले. आभार प्रवीण साळवे यांनी मानले.