सेवाप्रीतच्या महिलांचा पुढाकार
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शारीरिक आरोग्य महत्त्वाचे -जागृती ओबेरॉय
नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून गुलमोहर रोड येथील आनंद विद्यालयात मुला-मुलींच्या सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे निरोगी व सदृढ आरोग्याचा संदेश देत सेवाप्रीतच्या महिलांनी पुढाकार घेऊन लोटस लॅबोरेटरीजच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला.
या शिबिरासाठी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख निशा धुप्पड, मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, लोट्स लॅबोरेटरीजचे नरेश नय्यर, ग्रुप लीडर सिमरन वधवा, अर्चना खंडेलवाल, रितू वधवा, सदस्य रिटा बक्षी, नताशा धुप्पड, गीता धुप्पड, अर्चना ओबेरॉय, संगीता ॲबट, अनुभा ॲबट, अभिलाषा मदान, अनिता शर्मा, गृषा वधवा आदींसह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शारीरिक आरोग्य महत्त्वाचे असून, चांगले आरोग्य लाभल्यास विद्यार्थ्यांना जीवनातील ध्येय गाठता येणार आहे. या दृष्टीकोनाने सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने पुढाकार घेतला होता. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य असून त्यांच्या आरोग्यासाठी सेवाप्रीतचे सातत्याने योगदान राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका शारदा पोखरकर यांनी महिलांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन पाहुण्यांचे स्वागत केले. नरेश नय्यर यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने सीबीसी व पीबीएस आणि इतर रक्तातील घटकांचे प्रमाण तपासण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
निशा धुप्पड म्हणाल्या की, सदृढ आरोग्याने समाजाची विकासात्मक दिशेने वाटचाल होणार आहे. समाजाची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी सेवाप्रीतने पुढाकार घेतला आहे. गंभीर आजाराचे धोके टाळण्यासाठी वेळोवेळी विविध तपासण्या आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तिळगुळ व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी बब्बू धुप्पड, वीना ओबेरॉय, विना खुराणा, अंशू कंत्रोड, डॉ. सोनाली वहाडणे यांनी परिश्रम घेतले.