रविवारी दिवसभर वाडियापार्कमध्ये रंगणार कराटेचा थरार
खेळाला चालना देण्यासाठी शिवसेनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद -राधाकृष्ण विखे
नगर (प्रतिनिधी)- खेळाला चालना देण्यासाठी शिवसेनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. शहरात कराटे स्पर्धेसाठी उत्कृष्ट पध्दतीने आयोजन करुन खेळाडूंसह नागरिकांना कराटे स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने भरविण्यात आलेली ही स्पर्धा सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिवसेना, युथ कराटे फेडरेशन, स्पोर्ट्स ओके व अहिल्यानगर रुरल ॲण्ड अर्बन कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि.18 जानेवारी) जलसंपदामंत्री विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. वाडियापार्क क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, कराटे असोसिएशनचे साहिल सय्यद, सबिल सय्यद, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, आकाश कातोरे, शहर प्रमुख पै. महेश लोंढे, साईनाथ आधाट, अशितोष डहाळे, कैलास माने, संतोष वाळुंजकर, पुष्पा येळवंडे, सलोनी शिंदे, शोभना चव्हाण, नामदेव लंगोटे, रवी लालबोंद्रे, सुनील लालबोंद्रे, ओमकार शिंदे, पोपट पाथरे, सुभाष आल्हाट, मनोज लोंढे, आनंद शेळके आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की, युवकांना प्रोत्साहन व दिशा देण्याचे कार्य शिवसेना करत आहे. मुला-मुलींमधील खेळाडूंना चालना देण्यासाठी शिवसेनेने या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. राज्याला दिशा देण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. त्यांच्या नावाने भरवण्यात आलेले चषक खेळाडूंना ऊर्जा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन जाधव म्हणाले की, या स्पर्धेत महाराष्ट्र व राज्य बाहेरून 15 संघांचा सहभाग आहे. 830 खेळाडूंची नोंदणी झालेली आहे. खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण झाल्यास भविष्यातील आजार टाळता येणार आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन राज्यासह शहरात शिवसेना योगदान देत आहे. समाजकारण हा प्रमुख उद्देश ठेवून शिवसेनेची वाटचाल सुरु असून, भविष्यात आनखी स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिल शिंदे म्हणाले की, जिल्ह्याला खेळाडूंचा मोठा वारसा आहे. विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. समाजकारण करताना राजकारणाची भूमिका बाजूला ठेवून शिवसेनेचा समाज उपयोगी कार्यासाठी नेहमीच पुढाकार राहणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी (दि.19 जानेवारी) सकाळ ते संध्याकाळ पर्यंत वाडियापार्क क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये कराटेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेमधून चॅम्पीयन ठरणार आहे. 8, 10, 12, 14, 18 वर्षांखालील व 18 वर्षांवरील वगोगटात विविध वजनगटामध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक वयोगटातील विजेत्यास 5 हजार रोख व सर्वात जास्त सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाला 51 हजार रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.