• Wed. Feb 5th, 2025

ॲड. शारदाताई लगड यांचा सावित्री-ज्योती गौरव पुरस्काराने सन्मान

ByMirror

Jan 16, 2025

विधी क्षेत्रातील कार्य व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल

नगर (प्रतिनिधी)- गेल्या 32 वर्षापासून जिल्हा न्यायालयात विधी क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रासह महिला सक्षमीकरणाच्या कार्यात योगदान देणाऱ्या ॲड. शारदाताई लगड यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गुलमोहर रोड, कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवामध्ये खासदार निलेश लंके यांच्या हस्ते ॲड. लगड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष किशोर डागवाले, सिने कलाकार राजेंद्र गटणे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, सुहासराव सोनवणे, रजनी ताठे, प्रा. हर्षल आगळे, डॉ. रमेश वाघमारे, संयोजिका जयश्री शिंदे, मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे आदी उपस्थित होते.


खासदार लंके यांनी ॲड. लगड यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन, महिलांनी महिलांसाठी कार्य उभे केल्यास मोठी सामाजिक चळवळ उभी राहून महिलांचे प्रश्‍न सहज सुटणार असल्याचे स्पष्ट केले. हजारो बचत गटांच्या समक्ष मानाचा सावित्री ज्योती गौरव पुरस्कार घेताना आनंद होत आहे. पुरस्काराने कामाची जबाबदारी वाढत असून, अंबिका महिला बँकेच्या माध्यमातूनही कार्य सुरू राहणार असल्याची भावना ॲड. लगड यांनी व्यक्त केली.


शारदाताई लगड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. बचत गटाच्या चळवळीत अनेक वर्षे ते कार्य करीत असून, महिला सक्षमीकरणासाठी विशेष योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. सेमी पैठणी साडी, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.


पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. सुरेश लगड, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. विद्या शिंदे, ॲड. दिलीपराज शिंदे, ॲड. शकिल पठाण, अशोक कासार, रावसाहेब काळे, बाळासाहेब पाटोळे, अनंत द्रविड, ॲड. सुमतीलाल बलदोटा, ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. राजेश कातोरे, आरती शिंदे आदींसह विविध क्षेत्रातील व्यक्तीने त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *