जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविलेल्या उपक्रमाची दखल
नगर (प्रतिनिधी)- येथील भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय मराठी विभागातर्फे तिसरे स्त्री शिक्षक साहित्य संमेलन पार पाडले.
या कार्यक्रमात संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत कॉ. किरण मोघे यांच्या हस्ते काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संमेलनाचे निमंत्रक आमदार रोहित पवार, स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके, संमेलनाध्यक्षा डॉ. वंदना महाजन, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडके, बाळासाहेब साळुंके, सुभाषचंद्र तनपुरे, निर्मलाताई पाटील, मंगलताई पाटील, विमल माळी, प्राचार्य डॉ. संजय नगरकर उपस्थित होते.
अनिता काळे या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे. तर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी शाळेचा कायापालट केला आहे. सावित्रीबाई फुले यांचा वैचारिक वारसा त्या पुढे चालवत आहे. गेल्या दोन दशकापासून त्या जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान देत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उद्योग, व्यावसायिक प्रशिक्षण राबविणे, विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान, चर्चासत्राच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करत आहेत.
महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन त्यांनी उत्तम प्रकारे महिलांचे संघटन केले आहे. व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.