लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेचा 20 डिसेंबरला थाळी बजाव आंदोलन
मुलांची शिष्यवृत्ती आणि इतर शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून कामगार वंचित
नगर (प्रतिनिधी)- आश्वासन देऊनही बांधकाम कामगारांच्या नोंदणी होत नसल्याने, त्यामुळे बांधकाम कामगारांना मुलांची शिष्यवृत्ती आणि इतर शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याने लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा प्रश्न तात्काळ मार्गी न लागल्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर 20 डिसेंबर रोजी थाळी बजाव आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर बांधकाम कामागारांच्या सदर प्रश्नाकडे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या नोंदणीच्या प्रश्नासंदर्भात 7 ऑक्टोबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. सात-आठ महिन्यांपूर्वी भरलेले नोंदणी अर्ज अद्यापि मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे मुलांची स्कॉलरशिपचे अर्ज चार-पाच महिन्यांपासून मंजूर आहेत, परंतु ते बांधकाम कामगारांची नोंदणी होत नसल्याने ते अर्ज मंजूर केले जात नाहीत. रिनिवलची पण परिस्थिती जैसे थी, तशीच आहे. संसार किटचा कॅम्प लावून त्याचा लाभ संघटनेच्या बांधकाम कामगार सभासदांना मिळावा व कर्जत तालुक्याला हॉस्पिटल मंजूर करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रश्नी एका महिन्यामध्ये सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढा म्हणून शासन निर्णय काढण्यात आले आहे, तरीही अजून ते काम प्रलंबित आहेत. बीओसी सेंटर कामगारांना अधिकचे कागदपत्रे मागतात, ते लवकरात लवकर बंद व्हावे. संपूर्ण राज्यांमध्ये कामगारांचा ऑनलाइन फॉर्म भरताना 90 दिवसाचे पेज शॉप ॲक्ट लायसन्स वापरले जात आहे. परंतु नगरमध्ये शॉप ॲक्ट लायसन्सने अर्ज भरले तर ते नामंजूर केले जात आहे. त्यामुळे कामगारांना अडचण येत असून, शॉप ॲक्ट लायसनवर फॉर्म मंजूर करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.