फिनिक्स सोशल फाऊंडेशनने भरले नागरिकांचे संकल्प अर्ज
मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलणार -जालिंदर बोरुडे
नगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 134 व्या स्मृतीदिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर यावेळी मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाची जागृती करण्यात आली.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाचे महत्त्व विशद करुन नागरिकांना संकल्प अर्जाचे वाटप केले. यावेळी अभिषेक चिपाडे, किरण जावळे, राजेंद्र बोरुडे, रमेश चिपाडे, विनायक नेवसे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, समाजात महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करुन त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन करून शिक्षणाची मूर्तमेढ रोवली. त्यांच्या कार्याने समाज सावरला गेला आहे. आज समाजाने देखील महापुरुषांच्या त्यागाची जाणीव ठेऊन मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान करणे काळाची गरज बनली आहे. मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान होत नसल्याने अनेक रुग्ण नेत्र व अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने सात व्यक्तींना जीवदान मिळते. शरीर हे नश्वर असून, मरणोत्तर अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांचे नेत्रदान व अवयवदानाचे संकल्प अर्ज भरुन घेण्यात आले.
