• Sat. Jul 19th, 2025

शहरातील जुन्या बस स्थानकाच्या वास्तूला सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची भावनिक भेट

ByMirror

Nov 19, 2024

डोळ्यात साठवल्या शेवटच्या आठवणी

नव्याने उभारले जात असलेले बस स्थानक पाहण्यासाठी परमेश्‍वराकडे आयुष्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा (जुने) बस स्थानक पाडून नव्याने बांधले जात असताना, सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी आपली कर्मभूमी असलेल्या माळीवाडा बस स्थानकाला भेट देऊन शेवटची आठवण आपल्या डोळ्यात साठवली. तर नव्याने उभारले जात असलेले बस स्थानक पुन्हा पाहण्यासाठी परमेश्‍वराकडे आयुष्याची मागणी केली. एकत्र जमलेल्या सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक जुन्या गोष्टींनी उजाळा दिला.


एसटी महामंडळाच्या माळीवाडा बस स्थानकच्या जुन्या इमारतीच्या वैभवाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यातून सेवानिवृत्त एसटी कर्मचारी हजर होते. सन 1955 मध्ये एसटी महामंडळाने मोठे बस स्थानक बांधले होते. त्याला 69 वर्ष झाले. त्याची पडझड झाली असताना, कार्यालयाची जागा अपुरी पडत असताना महामंडळाकडून नवीन बस स्थानक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जुने बस स्थानकात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आपली हयात घालवली. कोट्यावधी प्रवासी वाहतुकीचा इतिहास घडवला. महाराष्ट्रात सर्व प्रथम एसटी महामंडळाची मुहुर्तमेढ याच बसस्थानकात रोवली गेली.

यामुळे अनेकांचे भावनिक नाते या बसस्थानकाशी जुळले आहे. एसटी महामंडळाने भव्य स्वरुपात अद्यावत बस स्थानक उभारण्याचे काम सुरु केलेले असताना, जुने बस स्थानकाच्या इमारतीला शेवटचे निरोप देण्यासाठी वास्तूला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे यांनी दिली.
याप्रसंगी सेवानिवृत्त कामगारांनी वास्तूला भेट देऊन, वास्तूच्या आठवणी डोळ्यात साठवले. या वास्तूशी अनेकांचे भावनिक नाते जुळले असताना, अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या.

यावेळी सर्वात वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचारी अर्जुन बकरे, साहेबराव चौधरी, रावसाहेब चौधरी आणि सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येनेउपस्थित होते. जुन्या वास्तूला भेट देण्याच्या गंगाधर कोतकर यांच्या संकल्पनेने सर्व सेवानिवृत्त कर्मचारी जमले होते. नव्या वास्तूच्या उद्घाटनाला सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *