• Tue. Jul 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात बालदिन उत्साहात साजरा

ByMirror

Nov 14, 2024
शहरात बालदिन उत्साहात साजरा

माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा या अभियानाचे प्रारंभ

आकाशात तीरंगे फुगे सोडून, पंडित जवाहरलाल नेहरुंना अभिवादन

नगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित उडान व बालभवन, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि रेडिओ नगर (90.4 एफ.एम.) यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी लहान मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. बालहक्क आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत, स्नेहालयच्या उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाच्या माध्यमातून माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा या अभियानास प्रारंभ करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, स्नेहालय बालभवनचे मानद संचालक संजय बंदिष्टी, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रविण कदम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, स्नेहालयाचे संचालक हनिफ शेख, उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, संदीप क्षीरसागर, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी अक्षय दरेकर, चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश सुर्यवंशी, बालभवनच्या उषा खोल्लम, डॉ. अंशु मुळे, बालकल्याण समिती सदस्या ॲड. अनुराधा येवले, मिजगर लायब्ररी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका (प्राथमिक) रुमाना खान, मुख्याध्यापक (माध्यमिक) जफर शेख, संस्थेचे अध्यक्ष इनामूल्ला खान आदींसह बालभवन व मिसगर लायब्ररी उर्दू शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. परिसरात तिरंगे ध्वज, रांगोळी व फुग्यांची सजावट करण्यात आली होती. चाईल्ड लाईन व बालभवनच्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय…., देश की ताकत हम सब बच्चे…, जोडो जोडो भारत जोडो… च्या घोषणा देत आकाशात फुगे व पांढरे कबुतरे सोडली. तर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प बालकांनी केला. यावेळी बालकांना आपल्या कुटुंबातील प्रौढ सदस्यांकडे निरपेक्ष व अमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आग्रह धरण्याचे शपथ देण्यात आली.


प्रास्ताविकात हनीफ शेख म्हणाले की, बालकांचे हक्क, अधिकाराच्या संरक्षणासाठी स्नेहालयाचे बालभवन प्रकल्प मागील 35 वर्षापासून कार्यरत आहे. बालभवनचे झोपडपट्टी भागातील दीड हजार बालकांसोबत काम सुरु असून, अडीच लाख बालकांपर्यंत ही संस्था पोहोचलेली आहे. बालकांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी व बालकांच्या हक्कांची जपणूक करण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. बालविवाह या कुप्रथेला रोखण्यासाठी उडान प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले असून, 400 पेक्षा अधिक बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. यावर्षी माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा हे अभियान सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले की, समाजातील बालकांसाठी चौकटी बाहेर जाऊन स्नेहालय बालभवनचे कार्य सुरू आहे. झोपडपट्टी भागात शैक्षणिक वातावरण निर्माण करून, त्यांना दिशा देण्याचे काम केले जात आहे. जिथे शासन पोहचू शकत नाहीत, अशा ठिकाणी स्नेहालय विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे कार्य करत आहे. अशा संस्थेची समाजाला व देशाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रवीण कदम म्हणाले की, भविष्यातील धोका टाळण्यासाठी बालकांनी व्यक्त होण्याची गरज आहे. कसलीही भीती वाटत असल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींकडे सांगणे गरजेचे आहे. बालकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून वावरण्याचे त्यांनी आवाहन केले. मन्सूर शेख यांनी बालदिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


डॉ. अंशु मुळे यांनी बालकांचे बालकत्व जपण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने योगदान देण्याचे स्पष्ट केले. अक्षय दरेकर यांनी आपल्या हक्कांपासून मुले वंचित राहू नये, यासाठी बालदिन साजरा व्हावा. आजची बालके ही उद्याचा भविष्य आहे. त्यांचे बालपण जपण्यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संजय बंदिष्टी यांनी सथी प्रथेप्रमाणे बालविवाह ही भयानक प्रथा आहे. यामुळे मुला-मुलींचे भवितव्य धोक्यात येते. यासाठी जागृती आवश्‍यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पासपुल आणि दीपक धायतडक यांनी केले. आभार ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहालय, बालभव व उडान प्रकल्पाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *