रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
मंगळवार पासून उपोषण करण्याचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागात राहत असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करुन हिनतेची वागणुक देणाऱ्या मंगलगेट येथील त्या व्यक्तीवर ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. यावेळी रिपाई महिला आघाडीच्या शहराध्यक्षा धनवर्षा साळवे, सुनिता साळवे, रेखा दाभाडे, तेजस्विनी साळवे, श्रद्धा पातकळ, मंगल बडेकर, संपदा म्हस्के, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, अविनाश कांबळे आदी उपस्थित होते. सदर प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास मंगळवारी (दि.22 ऑक्टोबर) पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
अविनाश कांबळे उर्फ बिपाशा रिटा या रामवाडी भागातील मागासवर्गीय युवकाने ट्रान्सजेंडर केले आहे. तो तृतीयपंथीय म्हणून वावरत आहे. मात्र 5 सप्टेंबर रोजी नगर-मनमाड रोड, दीपक पेट्रोल पंप या ठिकाणी रात्रीच्या वेळी मंगलगेट येथील एका व्यक्तीने आधी पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन तृतीय पंथीय कांबळे यांना जीतावाचक शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणुक दिली. कांबळे हा मागासवर्गीय असल्याचे सदर व्यक्तीला माहित असताना त्याने मुद्दामहून त्याला जीतीवर अपमानास्पद शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तेथील लोकांनी मध्यस्थी करुन त्यांचे भांडण सोडवले. या प्रकरणी कांबळे तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये रात्रीच्या 12 वाजल्याच्या दरम्यान तक्रार देण्यासाठी गेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांची तक्रार पोलीसांनी घेतली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर प्रकरणी कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज देऊन देखील संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने रिपाई महिला आघाडीच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
