इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- सीए हे आर्थिक घडी विस्कटू देत नाही. आर्थिक गणित उत्तम ठेवण्यासाठी व योग्य आर्थिक नियोजनासाठी सीए हे महत्त्वाचा घटक आहे. देशाची आर्थिक प्रगतीत सीए यांचा मोठा हातभार लागत असल्याचे प्रतिपादन श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. माणिक विधाते यांनी केले.
उत्कृष्ट सीए घडविणाऱ्या बुरुडगाव रोड येथील इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) नगर शाखेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा आमदार संग्राम जगताप सोशल फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. विधाते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, उत्कृष्ट सीए घडविण्याचे कार्य इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) नगर शाखेच्या वतीने होत आहे. वर्षभर संस्थेचे उत्तमपणे कार्य सुरु असते. समाजातील आर्थिक गणित उत्तम ठेवण्याचे कार्य सीए वर्गाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आयसीएआय नगर शाखेचे चेअरमन सीए सनित मुथा, व्हाईस चेअरमन सीए प्रसाद पुराणिक, सचिव सीए अभयकुमार कटारिया व माजी अध्यक्ष सीए पवनकुमार दरक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच धुळे येथील सीए गोवर्धन मोदी व मुंबई येथील सीए गौतम लाथ यांचा देखील सत्कार पार पडला.
