महिलांसमोर अंतरवस्त्रावर येऊन लज्जा उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी
महिलांसह लहान मुला-मुलींमध्ये भितीचे वातावरण
नगर (प्रतिनिधी)- महिलांना वाईट नजरेणे पहाणे, मुला-मुलींचे बोलताना व्हिडिओ चित्रीकरण करणे, महिलांसमोर अंतरवस्त्रावर घराबाहेर येऊन लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करणे, अश्लील भाषा वापरणे व मोठ्या आवाजात गाणे लावणाऱ्या बुरुडगाव रोड येथील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये राहत असलेल्या त्या व्यक्तीविरोधात महिलांनी आवाज उठवून थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांची भेट घेऊन महिला व स्थानिक नागरिकांनी सदर प्रकरणी त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
याप्रसंगी सविता देसर्डा, पल्लवी गिरे, शोभा पवार, आरती चोपडा, राणी चुत्तर, भारती झंवर, वर्षा पाटोळे, दिया पोखरणा, श्यामा पोखरणा, आशा चोपडा, प्रगती चोपडा, वैष्णवी झंवर, माया भुजंग, राजेंद्र राऊत, बाबासाहेब पवार, संदीप चोपडा, पराग शालिग्राम, योगेश काळे, अतुल चोपडा, नीरज चोपडा, दिनेश काळे, बाबासाहेब मुळे, प्रियंका काळे, मनीष झंवर, आकाश पवार, विशाल छाजेड, कांचन शेळके आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुरुडगाव रोड आयटीआय कॉलेज समोर सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या अशोक बोरा या व्यक्तीवर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 2 मे 2023 मध्ये चाकूचा धाक दाखवून कॉम्प्लेक्स मधील व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. तर नुकतेच रविवारी (दि.13 ऑक्टोबर) एका महिलेने घंटा गाडीत कचरा टाकण्यास गेले असता अंतरवस्त्रामध्ये येऊन त्या व्यक्तीने महिलेकडे एकटक पाहत होता. याबाबत त्याच्याकडे विचारणा केल्यास त्याने महिलेच्या मुलाला व कुटुंबीयांना चाकूने मारण्याची धमकी दिली. तसेच अश्लील चाळे करत असल्याची तक्रार दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर व्यक्ती बिल्डिंगच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहतो. घंटागाडी आल्यानंतर बिल्डिंग मधील महिला कचरा टाकण्यासाठी खाली आल्यावर तो सदर व्यक्ती अंतरवस्त्रामध्ये बाहेर येऊन त्यांना एक टक पाहत असून, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत आहे. कचरा गाडी जात नाही, तोपर्यंत हा व्यक्ती उभा असतो. महिलांचे शूटिंग काढणे, राहत्या घरात जोरजोरात अश्लील गाणे लावणे, संध्याकाळी महिला फिरत असताना त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहत असल्याने सर्व महिलांना त्या व्यक्तींपासून धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदर व्यक्तीने फ्लॅटच्या बाहेर पत्र्याचे शेड अतिक्रमण केलेले आहे. शेडमध्ये प्लास्टिकच्या साहित्य विक्रीसाठी ठेवलेले असल्याने कॉम्प्लेक्समध्ये आग लागण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. सदर व्यक्ती नंगट स्वरुपाचा असल्याने त्याला कसलीही भीती राहिलेली नाही. त्याच्यामुळे लहान मुले-मुली व महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असल्याचे स्पष्ट करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक महिला व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
