लाल मातीच्या आखाड्यात रंगले डावपेच
कुस्ती मैदानात महाराष्ट्रातील तोडीसतोड मल्ल भिडले
नगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) कुस्ती मैदान उत्साहात पार पडले. हलगी कडाडली आणि लाल मातीच्या आखाड्यात रंगतदार डावपेचचा थरार रंगला होता. केडगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने पै. हर्षवर्धन कोतकर यांनी या कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. यामध्ये महाराष्ट्रातील तोडीस तोड असलेले नामवंत मल्ल भिडले. निकाली कुस्त्यांनी ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विजेत्या मल्लांवर रोख बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला. केडगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कुस्ती पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

प्रारंभी हनुमानजी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करुन आखाडा पूजनाने कुस्तीला प्रारंभ करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. यावेळी महादेव (अण्णा) कोतकर, पै. हर्षवर्धन कोतकर, संपत कोतकर, अंबादास गारुडकर, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, शहराध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, पै. वसंत पवार, लक्ष्मण सोनाळे, पोपट शिंदे, अजय अजबे, ऋषिकेश खोत, नगरसेवक संग्राम शेळके, पै. सुदर्शन कोतकर, विराज शेळके, सागर गायकवाड, गणेश बिचीतकर, सुनील (मामा) कोतकर, बबलू कोतकर, रमेश कोतकर, अभिजीत कोतकर, संपत कोतकर, महेश गाडे, दीपक गिऱ्हे, विठ्ठल महाराज कोतकर, संग्राम केदार, संदेश शिंदे, मोहन हिरणवाळे, बाळू भापकर, दादू चौगुले, संतोष पानसरे आदींसह कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल, वस्ताद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवी रोड जवळील मैदानात दुपारी 4 वाजता कुस्ती मैदानाला प्रारंभ झाले. प्रारंभी लहान मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. त्यानंतर बक्षीसांवर ठरलेल्या मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाले. तोडीस तोड असलेल्या मल्लांच्या कुस्त्या रंगल्या होत्या. नियोजीत 32 कुस्त्या नियोजनाप्रमाणे रात्री उशीरा पर्यंत सुरु होत्या. पहिल्या पाच क्रमांकाच्या प्रेक्षणीय कुस्त्या शेवटी लावण्यात आल्या. मैदानात प्रेक्षकांना बसण्यासाठी सोय करण्यात आली होती. हंगेश्वर धायगुडे यांनी कुस्तीची विविध माहिती देऊन बहारदार समालोचन केले.

