• Wed. Nov 5th, 2025

ओबीसी संपर्क अभियानाद्वारे साधला शहरातील ओबीसी समाजाशी संवाद

ByMirror

Oct 9, 2024

ओबीसी समाजातील विविध प्रश्‍न व विकासात्मक कार्यावर विचारमंथन

ओबीसींच्या उपेक्षित जाती समुहांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रवादीने केले -कल्याण आखाडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला जोडण्यासाठी व एकजुटीने पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून ओबीसी संपर्क अभियान राज्यात सुरु आहे. राज्यातील लोकसंख्येच्या 52 टक्के ओबीसी समाज असून, यामध्ये अनेक लहान-मोठ्या जातींचा समावेश आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या ओबीसी मधील जाती समुहाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जात आहे. शहरात आमदार संग्राम जगताप देखील ओबीसी समाजाला बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी योगदान देत असल्याची भावना राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रांत अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले.


राष्ट्रवादीच्या वतीने (अजित पवार गट) शहरात ओबीसी संपर्क अभियान व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी (शहर व दक्षिण) विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी समाज बांधवांशी संवाद साधताना आखाडे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, ओबीसी विभागाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष इंजि. डी.आर. शेंडगे, शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, अंबिका भुसे, ॲड. अंजली आव्हाड, उषाताई शेंडगे, मनिषाताई उल्हारे, सौ. मळगे, अश्‍विनी शेंडगे, राजेंद्र खरात, शोभाताई दातीर, सौ. धायगुडे, माऊली कजबे, दीपक खेडकर, संभाजी रूपनर, जनार्दन शेंडगे, विभिषण भंडारे, राजेंद्र पुंड, नाना रूपनर, अजय दिघे, चंद्रकांत मेहेत्रे, मारुती पवार, उमेश धोंडे, वैभव ढाकणे, ॲड. योगीता कोकरे, सारंग पंधाडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ओबीसी समाजबांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे आखाडे म्हणाले की, राज्यात सरकारने ओबीसी समाजासाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना त्यांच्या पर्यंत घेऊन जाण्याची व समाजासाठी केलेल्या कामाची माहिती देण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे वंचित व उपेक्षित राहिलेल्या जाती समुहांना न्याय देण्याची भूमिका सरकारच्या वतीने घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर पक्षाला मजबुत करण्यासाठी ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात इंजि. डी.आर. शेंडगे म्हणाले की, ओबीसी वर्गाला प्रवाहात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सत्तेत राहून अनेक योजनांचा लाभ समाजासाठी मिळवून दिला. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची व न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादीची राहिली आहे. तर शहरातही आमदार संग्राम जगताप ओबीसी समाजाचे नेतृत्व करुन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम करत आहे. ओबीसी समाजाला न्याय देण्याची भूमिका ठेऊन समाजाच्या विकासासाठी ते योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठा फरक असतो. राज्यातील राजकारण व स्थानिक व्यक्तीच्या पाठिशी उभे राहण्याचे काम जनता करत असते. शहराला विकासाची दिशा देणारे व सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे आमदार जगताप यांच्या पाठिशी ओबीसी समाज एकवटणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. संपत बारस्कर यांनी ओबीसी समाजासाठी आमदार जगताप यांनी केलेल्या कामांची माहिती देऊन, पुन्हा त्यांना समाजाच्या सेवेसाठी व शहराच्या सर्वांगीन विकासासाठी संधी देण्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *