आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत कान, नाक, घसा तपासणी शिबिरास प्रतिसाद
110 रुग्णांची मोफत तपासणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- गोर-गरीबांच्या आरोग्य सेवेतून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नाव राज्यभर पसरले आहे. सेवा हा मुख्य उद्देश ठेऊन हॉस्पिटल कार्यरत आहे. व्याधीने त्रासलेल्या पीडितांच्या वेदना दूर करण्याचे काम हॉस्पिटलमध्ये केले जात आहे. कृतार्थ व सेवाभावाने आरोग्य सेवेचे कार्य सुरू असून, सर्वसामान्यांना अद्यावत आरोग्याच्या सुविधा मिळत आहे. या सेवाकार्यात परिवाराच्या वतीने योगदान देताना समाधान मिळत असल्याची भावना मर्चंट बँकेचे संचालक आनंदराम (अण्णाशेठ) मुनोत यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये लालचंद आनंदराम मुनोत (नेवासकर) परिवाराच्या वतीने आयोजित मोफत कान, नाक, घसा तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आनंदराम मुनोत बोलत होते. याप्रसंगी डॉ. प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा, डॉ. वसंत कटारिया, माणकचंद कटारिया, प्रकाश छल्लाणी, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, शिबिरातील तज्ञ डॉक्टर डॉ. सुकेशिनी गाडेकर, डॉ. अतुल तुपे आदी उपस्थित होत.
प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, मुनोत परिवाराचे हॉस्पिटल उभारणीपासून योगदान राहिले आहे. तर विविध समाजकार्यात त्यांचा पुढाकार असतो. शहराच्या समाजकारणाशी मुनोत परिवाराचे नाव जोडले गेलेले आहे. हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांकडून उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळत असून, आरोग्याबरोबरच भगवान महावीर युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल उभे राहत आहे. त्याचे काम देखील प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. सुकेशिनी गाडेकर व डॉ. अतुल तुपे यांनी कान, नाक, घसा यांच्या विकारावर हॉस्पिटलमध्ये असलेल्या अद्यावत उपचार पध्दती व सोयी-सुविधांची माहिती दिली. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी कान, नाक, घसाच्या आजारा संबंधीत 110 रुग्णांची तपासणी केली. या शिबिराच्या माध्यमातून विविध तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
