21 वटवृक्ष, 1 गोरख चिंच व 11 जांभळ्याच्या झाडांची लागवड
जय हिंदच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मंदिर परिसर व तीर्थ क्षेत्र हिरवाईने फुलणार -सुदर्शन महाराज शास्त्री
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम राबविणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने त्रिभुवन वाडी (ता. पाथर्डी) येथील त्रिभुवनेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यातील विविध मंदिर परिसर हिरवाईने फुलविण्याची मोहिम संस्थेच्या वतीने हाती घेण्यात आली असून, या उपक्रमांतर्गत वृक्षरोपणाच्या माध्यमातून सदर ठिकाणी 21 वटवृक्ष, 1 गोरख चिंच 11 जांभळ अशा 33 देशी झाडांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण अभियानाप्रसंगी ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री कारखेले, दत्ता कारखेले, युवराज कारखेले, बाबासाहेब कारखेले, अंबादास कारखेले, रोहिदास कारखेले, मच्छिंद्र कारखेले, रावसाहेब कारखेले, शिवाजी कारखेले, नामदेव कारखेले, नवनाथ कारखेले, भद्री कारखेले, अजिनाथ कारखेले, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, संजय पाटेकर, केरू कारखेले, भीमराज कारखेले, संभाजी कारखेले, भास्कर पालवे, संजय जावळे, महादेव पालवे, संदीप पालवे आदी उपस्थित होते.
ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री यांनी जय हिंद फाउंडेशनने जिल्ह्यातील विविध मंदिर परिसर व तीर्थ क्षेत्र परिसर हिरवाईने फुलविण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या मोहिमेद्वारे पर्यावरण संवर्धन होणार असून, निसर्गाला पुनर्वैभव प्राप्त होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी पालवे म्हणाले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरामध्ये वटवृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मंदिर परिसरात भविष्यात वडराई फुलणार आहे. त्यामुळे भाविकांना निसर्गाच्या सानिध्यात आत्मिक समाधान मिळणार आहे. त्रिभुवनवाडीला वृक्षरोपण व संवर्धनाने निसर्गाचे वैभव प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रत्येक व्यक्तीने वृक्षक्रांती चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आली. आभार शिवाजी गर्जे यांनी मानले.
