341 ग्रामस्थांची नेत्र तपासणी
पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मिरी (ता. पाथर्डी) येथे घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कै. सुखदेव माधवराव वेताळ यांच्या पुण्यस्मरणार्थ घेण्यात आलेले 218 वे शिबिर होते. यामध्ये 341 रुग्णाची नेत्र तपासणी करण्यात आली. तर 47 गरजू रुग्णांवर पुणे येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या.
मेजर शिवाजी वेताळ यांनी गेल्या 23 वर्षा पासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवा देत आहेत. संस्थेच्या वतीने बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्यासह 217, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या सहयोगाने 49, देसाई हॉस्पिटल (पुणे) यांच्यासह 27 व पुना लेजर सेंटर (पुणे) यांच्यासह 23 शिबिरे घेतली आहे. दर महिन्याला शिबिराचे आयोजन करुन सर्वसामान्यांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे काम संस्थेच्या वतीने सुरु असल्याची माहिती दिली.

युवा नेते शुभमजी मोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच संतोष शिदे यांच्या हस्ते झाले. यावेळी बुधराणी हॉस्पिटलचे धर्माधिकारी, मिरा पठाडे यांनी रूग्णांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करुन, ग्रामस्थांना आजार टाळण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायामाचा सल्ला दिला. ॲड. स्नेहा वेताळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अनिता वेताळ यांनी आभार मानले. शिबिरातील मोतिबिंदू असलेल्या गरजू रुग्णांवर बुधराणी हॉस्पिटल (पुणे) येथे शस्त्रक्रिया पार पडल्या.
