प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम
मायेचा आधार मिळाल्यास दीन-दुबळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो -जयाताई गायकवाड
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवानिमित्त प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या महिलांनी एकत्र येत, कुष्ठधाम येथील ज्येष्ठ महिला व वृध्दांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. वंचित व दीन-दुबळ्यांना मायेचा आधार देण्यासाठी महिलांनी हा सामाजिक उपक्रम राबविला.
प्रारंभी कुष्ठधाम येथील सर्व वृध्दांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. बालकिसन फोफलिया यांच्या स्मरणार्थ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. लता डेंगळे व जीवनलता पोखरणा यांच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले. याप्रसंगी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, मिरा फोफलिया, लता डेंगळे, सावेडी ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, जीवनलता पोखरणा, नीलिमा पवार, अर्चना बोरुडे, आरती थोरात, अनुराधा फलटणे, आशा कटारे, जयश्री पुरोहित, प्रतिभा भिसे आदी उपस्थित होत्या.
जयाताई गायकवाड म्हणाल्या की, समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांना मदतीपेक्षा प्रेम व आपुलकीची गरज असते. दीन-दुबळ्यांना मायेचा आधार मिळाल्यास त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत असतो. वंचितांच्या जीवनात हास्य व आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुप सातत्याने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या सर्वांगीन विकासाबरोबरच सर्व महिला ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन सामाजिक योगदान देत असल्याची माहिती दिली. मिरा फोफलिया यांनी सण-उत्सवात वंचितांच्या जीवनात फुलवलेला आनंद आपल्या जीवनात समाधान देऊन आनंद द्विगुणीत करत असतो. यासाठी प्रत्येकाने वंचितांसाठी थोडेफार योगदान देण्याचे त्यांनी सांगितले.
