स्त्री शक्तीचा जागर करुन केली घटस्थापना
पारंपारिक वाद्यांचा गजर; सजवलेल्या रथातील जगदंबा मातेच्या मुर्तीने वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रेल्वे स्टेशन रोड येथील जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने घटस्थापनेची उत्साहात मिरवणुक काढण्यात आली. पारंपारिक ढोल पथकाच्या निनादात रंगलेल्या मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्त्री शक्तीचा जागर केला. सजवलेल्या रथात जगदंबा मातेच्या मुर्तीने सर्व भाविकांचे लक्ष वेधले. ढोल पथकाच्या वादनाने संपूर्ण परिसर निनादला.

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ रोकडे यांनी ही मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीत विमल रोकडे, सुमन मांगुर्डे, क्षितिजा रोकडे, शोभा जाधव, राणी खोसे, पूजा आंबुले, भावना कनोजिया, संध्या सप्रे, राधिका प्रसाद, शीतल शिंदे, कल्पना निमसे, रजनी शर्मा, रंजना गोसावी, कल्पना गाडेकर, सोनाली वाळुंज आदींसह परिसरातील युवक-युवती, महिला, आजी-माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उदे गं, अंबे उदे…, आई जगदंबा व तुळजा भवानी मातेच्या जय घोषाने आसमंत दुमदुमला. चौका-चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. डोक्यावर भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांनी सर्वांचे लक्ष वेधले.
आमदार संग्राम जगताप यांनी मंडळास भेट देऊन नवरात्र उत्सवाच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विधीवत घटस्थापना करण्यात आली असून, नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी नऊ दिवस विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ रोकडे यांनी दिली.
