• Tue. Nov 4th, 2025

रामवाडीच्या कचरा वेचक महिलांनी घेतला जाणीव जागृती शिबिराचा लाभ

ByMirror

Oct 4, 2024

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी भरुन घेण्यात आले अर्ज

कचरा वेचक स्वच्छतेसाठी विनामोबदला दररोज राबतो -अभिषेक कळमकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कचरा वेचकांना मिळण्यासाठी शहरातील रामवाडी येथे कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने जाणीव जागृती शिबिर राबविण्यात आले. स्वच्छ सेवा अभियानातंर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध शासकीय योजनांचे अर्ज भरुन घेण्यात आले.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय डाक विभागाचे सहाय्यक आधीक्षक राजेश नेहरकर, लीड बँकचे जिल्हा व्यवस्थापक आशिष नवले, इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे ब्रॅण्च मॅनेजर अमोल भुमकर, भाऊसाहेब उडानशिवे, विकास उडानशिवे, कचरावेचक कामगार सविता शिरोळे, सुनीता नेटके, ताई घाडगे, कालिंदा धाडगे, लंका बाई शिंदे, अलका बाई गायकवाड, विकास घाडगे, सागर खुडे लखन लोखंडे, सोमनाथ लोखंडे, गोपाल शिंदे, सचिन साळवे, डाक विभागाचे महेश सदाफुले, नितीन खेडकर, युवराज राऊत, सुनिल थोरात, संजय परभणे, शहेबाज शेख आदींसह अंगणवाडी सेविका व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


अभिषेक कळमकर म्हणाले की, कचरा वेचक हा समाजातील सर्वात शेवटचा घटक असून, स्वच्छतेसाठी विनामोबदला दररोज ते राबत असतात. जमलेल्या कचऱ्यातून आपाल्या कुटुंबाच्या गरजा भागवतात. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. सतत संघर्ष करुन हा वर्ग जगत आहे. कचरा वेचक अशिक्षित असल्याने संघटनेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरु असलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


भाऊसाहेब उडानशिवे म्हणाले की, रामवाडी भागात मोठ्या संख्येने कचरा वेचक महिला असून, त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. एकप्रकारे या महिला सार्वजनिक स्वच्छतेला देखील हातभार लावत असून, त्यांच्या भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचा विकास साधण्यासाठी कार्य सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.


या शिबिरात कचरा वेचकांचे जनधन झिरो बॅलन्स खाते उघडणे, एकल बालकांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचे फॉर्म भरून घेणे, कचरा वेचकांसाठीचे ई श्रम कार्ड, आयुष्मान भारत योजना, मतदार यादीत नाव समावेश करणे व रेशनकार्ड संबंधी केवायसी करून घेण्याबाबतचे काम करुन देण्यात आले. तसेच शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या शिबिरास डाक विभाग, लीड बँक व आय लव्ह नगरचे नरेंद्र फिरोदिया यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *