जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने 40 वडांच्या झाडाची लागवड
ज्येष्ठांचा आदर्श समोर ठेऊन पुन्हा निसर्गाकडे वळण्याची गरज -शिवाजी पालवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने कोल्हार जांनदरा सदोबा (ता. पाथर्डी) येथे वडराई फुलविण्याच्या उद्देशाने वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली. 40 वडाच्या झाडाची लागवड करुन या परिसरातील डोंगर रांगा हिरावाईने फुलविण्याचा निर्धार करण्यात आला.
गावातील ज्येष्ठ व्यक्ती पर्वत जाधव, मोहन डमाळे, लक्ष्मण जाधव, माजी सरपंच बाबाजी पालवे, माजी उपसरपंच कारभारी गर्जे, सदस्य किशोर पालवे यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियानाला प्रारंभ करण्यात आले. याप्रसंगी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, ॲड. पोपट पालवे, ॲड. संदिप जावळे, सनी गर्जे, संदिप पालवे, कैलास पालवे, संजय जावळे, सतीश साबळे आदी उपस्थित होते.

शिवाजी पालवे म्हणाले की, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवन व्यतीत केले. मात्र सध्या सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनले आहे. ज्येष्ठांचा आदर्श समोर ठेऊन पुन्हा निसर्गाकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरण हा समाजाचा आधार असून, हा आधार कोसळल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे. यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी सांगितले.
बाबाजी पालवे यांनी जय हिंदच्या माध्यमातून जिल्ह्यातील डोंगररांगा पुन्हा हिरवाईने नटणार असून, पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे. कोल्हारचा जांनदरा सदोबा परिसरात वडराई फुलणार असल्याचे स्पष्ट करुन जय हिंदच्या कार्याचे कौतुक केले. शिवाजी गर्जे यांनी कोल्हार गावात तेराशे वडाचे झाड लावण्यात आले असून, त्याच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. सर्वाधिक वडाचे झाड असलेला गाव म्हणून या या परिसराची ओळख निर्माण होणार असल्याची माहिती देऊन त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.