13 आणि 15 वर्षा आतील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेत होणार संघाचा समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवोदित खेळाडूंना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या फिरोदिया शिवाजीयन्स महाराष्ट्र युथ लीगसाठी शहरात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 13 आणि 15 वर्षा आतील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. ही स्पर्धा मुंबई येथे खेळविण्यात येणार असून, यामध्ये राज्यातील निवडक संघांना प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून संघ पाठविला जाणार आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी फुटबॉल संघ व खेळाडूंना सीआरएस नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त नरेंद्र फिरोदिया व शिवाजीयन्स स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र युथ लीगमध्ये राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंसह खेण्याची संधी मिळावी व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्याची संधी खेळाडूंना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 13 वर्षा आतील (2012 आणि 2013 मध्ये जन्मलेली मुले) व 15 वर्षा आतील (2010 किंवा 2011 मध्ये जन्मलेली मुले) यानांच यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. निवडलेले खेळाडू फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीसाठी नोंदणीकृत एडीएफए अंतर्गत खेळाडू असतील. निवड झालेले खेळाडू फिरोदिया शिवाजीयन्सकडून खेळतील. त्यांची निवड चाचणी अहमदनगर कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. निवड चाचणीनंतर स्पर्धेला संघ पाठविण्यासाठी पालकांची बैठक घेतली जाणार आहे.
फिरोदिया शिवाजीयन्स पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी व खेळाडूंचा पाया मजबूत करण्यासाठी 12 व 14 वर्षा आतील खेळाडूंची निवड करुन त्यांचा देखील सराव घेतला जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र युथ लीगसाठी अनुभवी प्रशिक्षकांकडून उच्च दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक गटातील 25 ते 30 मुलांची निवड केली जाणार आहे. सीआरएस नोंदणी न केलेल्या खेळाडूंना निवड चाचणीत खेळता येणार नाही.
खेळाडूंना त्यांचा मूळ जन्म प्रमाणपत्र आणि सोबत आधारकार्ड, पासपोर्ट आणणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पल्लवी सैंदाणे 8208771795 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.