लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने रॅली काढून शाळेत केले अभिवादन
समाजात धर्मवाद, जातीवाद व वंशवाद उफाळला असताना कर्मवीरांच्या विचाराने वाटचाल करावी लागणार -प्राचार्य एम.एम. तांबे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रविवारी (दि.22 सप्टेंबर) पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लेझीम, झांज व ढोल पथकाच्या निनादात शहरातून रॅली काढून कर्मवीरांचा जयघोष केला. रथात कर्मवीर भाऊरावांचे उभे तैलचित्र मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
शाळेतील वडाच्या झाडाखाली असलेल्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजींग कौन्सील सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम.एम. तांबे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, हाजी शौकत तांबोळी, अनिल साळुंके, स्कूल कमिटी सदस्य अंबादास गारुडकर, विश्वासराव काळे, माजी प्राचार्य कैलासराव मोहिते, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, शामराव व्यवहारे, शशिकांत तांबे, इमरान तांबोळी आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी विद्यार्थिनींनी रांगोळी स्पर्धेनिमित्त विविध सामाजिक विषयांवर रेखाटलेल्या रांगोळी दालनाचे उद्घाटन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात शिवाजी लंके यांनी संपूर्ण राज्यात रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. त्यांनी बहुजन समाज सुशिक्षित करण्याचे काम केले. शिक्षण आणि श्रमाची सांगड घालून सक्षम पिढी घडविण्याचा विचार त्यांनी दिला असल्याचे सांगून त्यांनी कर्मवीर भाऊराव यांच्या जीवन व रयत शिक्षण संस्थेबद्दल माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत छायाताई काकडे व ज्ञानदेव पांडुळे यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्राचार्य एम.एम. तांबे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जो समाजाला विचार दिला, तो महत्त्वाचा आहे. त्यांनी अस्पृश्यता, जाती-धर्म पाळला नाही. सातत्याने अस्पृश्यता निर्मूलनाचे काम त्यांनी केले. सत्यशोधक विचारांची पायाभरणी त्यांनी केली. बहुजन समाज सुशिक्षित करुन आभाळापेक्षा मोठे काम उभे केले. सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली. सध्या मोठ्या प्रमाणात धर्मवाद, जातीवाद व वंशवाद उफाळला असून, पुन्हा कर्मवीरांचे विचार घेऊन वाटचाल करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येकाने घरातच जात, धर्म ठेवावा, उंबरठ्याबाहेर पडताना सर्व भारतीय म्हणून वावरावे. महापुरुषांनी सर्व जातीसाठी कार्य केले, मात्र त्यांना विशिष्ट जातीमध्ये बंदिस्त करण्याचे काम केले जात आहे. धर्मविरहित समाज निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, त्या दृष्टीने मुलांमध्ये मूल्य रुजविण्याचे तांबे यांनी आवाहन केले.
हाजी शौकत तांबोळी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव यांनी शिक्षण चळवळ उभारली. वर्ण व जात व्यवस्था मोडकळीस आणून बहुजनांच्या घराघरात शिक्षण पोहोचवण्याचे काम केले. शैक्षणिक चळवळीचे खरे जनक कर्मवीर भाऊराव पाटील असल्याचे त्यांनी सांगितले. अंबादास गारुडकर यांनी कर्मवीरांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजाची मुले घडवली. शिक्षणाची संधी उपलब्ध करुन ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवली असल्याचे सांगून, जीवनात उंच ध्येय ठेवून वाटचाल करण्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी स्वरा दरेकर, वरद झावरे, मयुरी काळे, सानिका काळभोर या विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या जीवनावर भाषण करुन त्यांचा जीवनपट उलगडला.

दादाभाऊ कळमकर म्हणाले की, सक्षम समाज घडविण्याचे काम रयत शिक्षण संस्था करीत आहे. या संस्थेची लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळा गुणवत्तेसाठी आघाडीवर असून, विविध स्पर्धा परीक्षा, कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे व स्मिता पिसाळ यांनी केले. आभार महादेव भद्रे यांनी मानले.
