खरात यांनी जिल्ह्यातील युवा मंडळांना स्फुर्ती व दिशा देण्याचे काम केले -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात यांची राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, रमेश गाडगे, निलेश थोरात, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवा मंडळांना स्फुर्ती व दिशा देण्याचे काम शिवाजी खरात यांनी केले. केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व विविध उपक्रम गाव पातळीवर शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम त्यांनी युवा मंडळाच्या माध्यमातून केले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांची थेट राज्य संचालकपदी बढती झाली असून, हे त्यांच्या कामाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना शिवाजी खरात यांनी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था व युवा मंडळांनी साथ दिल्याने उत्तमप्रकारे कामे करता आली. सर्वांचे मिळालेले सहयोग नेहमीच स्मरणात राहणार असल्याचे सांगितले. उपस्थितांनी खरात यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.