आर्मी पब्लिक, प्रवरा पब्लिक, आठरे पाटील व एपीएस आर्मी स्कूलचे संघ विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत अटीतटीचे सामने रंगत असताना शुक्रवारी (दि.20 सप्टेंबर) तब्बल 8 सामने खेळविण्यात आले. सकाळ पासून सुरु झालेले 12, 14 व 16 वर्ष वयोगटातील फुटबॉलचे सामने संध्याकाळी उशीरा पर्यंत रंगले होते. यामध्ये आर्मी पब्लिक, प्रवरा पब्लिक, आठरे पाटील व एपीएस आर्मी स्कूलचे संघ विजयी झाले.
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर लीग पध्दतीने फुटबॉलचे सामने सुरु आहेत. 16 वर्ष वयोगटात कर्नल परब स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन तब्बल 12 गोल केले. या सामन्यात कर्नल परब स्कूलला एकही गोल करता आला नाही. आर्मी पब्लिक स्कूल संघाकडून गौरव (4), अश्मीत (1), यश (5), आयुश व वैभव या खेळाडूने प्रत्येकी 1 गोल केले. 0-12 गोलने आर्मी पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.

12 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल मध्ये अटीतटीचा सामना रंगला होता. या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलकडून कुनाल या खेळाडूने एकापाठोपाठ 2 गोल करुन विजय मिळवला. आर्मी पब्लिक स्कूल (एमआयसी ॲण्ड एस) विरुध्द प्रवरा पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने आक्रमक खेळी करुन प्रतिस्पर्धी संघावर 6 गोल केले. प्रवरा पब्लिक स्कूलच्या जयवर्धन, मोहित याने प्रत्येकी एक गोल, जतीन याने 3 गोल तर एक गोल प्रतिस्पर्धी संघाने स्वत:वरच गोल केला. यामध्ये 6-0 गोलने प्रवरा पब्लिक स्कूल संघाने विजय मिळवला. आठरे पाटील स्कूल विरुध्द तक्षिला स्कूलचा सामना शेवट पर्यंत रंगला होता. यामध्ये आठरे पाटील संघाकडून रुद्राक्ष वाघुले याने 2 तर सौम्या म्हस्के याने 1 गोल केला. तक्षिला स्कूलकडून आदित्य याने 1 गोल केला. यामध्ये 3-1 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी ठरला.
14 वर्ष वयोगटातील अशोकभाऊ फिरोदिया विरुध्द श्री साई स्कूलचा सामना ड्रॉ करण्यात आला. सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुध्द एपीएस आर्मी स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात एपीएस आर्मी स्कूल संघाने 3 गोल केले. 0-3 गोलने एपीएस आर्मी स्कूल संघ विजयी झाला. यामध्ये एपीएस आर्मी स्कूल संघाकडून विरेंद्र, तन्मय व सार्थकने प्रत्येकी एक गोल केला.
स्पर्धेचे पंच म्हणून जॉय जोसेफ, सुमित राठोड, प्रियंका आवारे, सोनिया दोसानी, ऋतिक छजलाणी, अभिषेक सोनवणे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्सचे सदस्य परिश्रम घेत आहे.
