पक्षाचा 67 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन
जिल्ह्यात क्रियाशील सदस्य नोंदणी अभियान सप्ताह राबविणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा 3 ऑक्टोबर रोजी सातारा येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन करणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे.

सातारा येथील तालिम संघ, पोलीस करमणूक केंद्राशेजारी तोफखाना येथे हा मेळावा होणार आहे. आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या मेळाव्यासाठी स्वागताध्यक्ष म्हणून अशोक वामन गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रीय महासचिव अविनाश म्हातेकर, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुरेश बारसिंग, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले, युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे, राज्य संघटन सचिव शहाजी कांबळे, महिला आघाडी राज्य अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, मातंग आघाडी आनंदराव वायदंडे, राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे आदींसह नागालँडचे आमदार उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात पक्षाच्या दृष्टीकोनाने महत्त्वाचे निर्णय घेऊन ठराव पास केले जाणार आहे. तर महत्त्वांच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. भविष्यातील विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकांना सामोरे जाताना पक्षाचे धोरण स्पष्ट केले जाणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना होण्यासाठी तालुकास्तरीय नियोजन बैठका सुरू आहे. तसेच पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात देखील विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. पक्ष सदस्य नोंदणीला गती देण्यासाठी क्रियाशील सदस्य नोंदणी अभियान सप्ताह राबविला जाणार असल्याचे साळवे यांनी म्हंटले आहे.
