गावपातळीवर ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व सांगून होणार सार्वजनिक स्वच्छतेचा जागर
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वच्छता पंधरवड्याचे स्वच्छता अभियानाने प्रारंभ करण्यात आले. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाच्या निर्देशानूसार गावपातळीवर हा उपक्रम राबवून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात येत आहे.
ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या अभियानाची सुरुवात करण्यात आली. गावातील बिरोबा मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी विजय गंधे, अतुल फलके, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, नामदेव भुसारे, अलफेज सय्यद, संगिता ठोकळे, मंदा पाचारणे, गौरव कोल्हे, साई भुसारे, प्रथमेश गायकवाड, ओम कांडेकर, शौर्य भुसारे, सार्थक शिंदे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, स्वच्छतेवर निरोगी आरोग्य विसंबून असून, मनुष्य स्वच्छतेचे भान विसरल्याने रोगराईला बळी पडत आहे. स्वच्छता हीच खरी सेवा आहे. या सेवेत सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. स्वच्छतेसाठी शासकीय विभागावर विसंबून न राहता आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गाव पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेची जागृकता निर्माण होण्याच्या उद्देशाने पथनाट्य, सार्वजनिक शपथ, व्याख्यान आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी या पंधरवड्याचा समारोप होणार आहे. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
