शुक्रवारी शहरातून निघणार झेंडा मिरवणुक; तर मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस दर्शनासाठी राहणार खुले
अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहंमद पैगंबर यांची जयंती (ईद मिलादुन्नबी) सोमवारी (दि. 16 सप्टेंबर) मुस्लिम बांधवांनी घरोघरी उत्साजात साजरी केली. मुस्लिम बहुल भागात भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त झेंडा मिरवणूक न काढता, शुक्रवारी (दि.20 सप्टेंबर) शहरातून झेंडा मिरवणुक काढली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस (हजरत बाल) भाविकांच्या दर्शनासाठी दुपार पर्यंत खुले ठेवण्यात आले होते. तर शुक्रवारी देखील संपूर्ण दिवसभर हे केस दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती पुजारी सय्यद बुऱ्हाण कादरी चिश्ती यांनी दिली.
शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आलेले आहेत. शहरातील विविध मशिदींवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. शुक्रवारी जुन्या कोर्टाजवळील जामा मशीद येथे नमाज पठण करून झेंडा मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. तर संध्याकाळी तख्ती दरवाजा मशिद येथून मुख्य मिरवणुकीला शहरातून प्रारंभ होणार आहे. ठिकठिकाणी प्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
