विद्यार्थ्यांनी उपवासाचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर करुन घडविले 24 तीर्थंकरांचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शांतता, समता आणि बंधुताचा संदेश देणारा संवत्सरी उत्सव अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना या सणाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपवासाचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर केली. तर जैन धर्माचे एकूण 24 तीर्थंकर यांचे दर्शन घडविले.
सकाळच्या सत्रात आनंदतीर्थ चिंचवड पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वर्षा संजय गुगळे, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, सुनीता मुथ्था, शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, माध्यमिक विभागप्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख कांचन कुमार आदी उपस्थित होते.

नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे परिचय व स्वागत श्रावणी देशमुख या विद्यार्थिनीने केले. विद्यार्थ्यांनी उपवासाचे महत्त्व व उद्दीष्ट सांगणारी नाटिका सादर केली. शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भक्ती गीताने कार्यक्रमाची रंगत वाढली. संजय गुगळे यांनी आपल्या भाषणात निर्जरा शब्दाचा अर्थ सांगून, उपवासाचे महत्त्व पटवून दिले. उपवासाने शरीर व आत्मशुध्दी होऊन पवित्रता प्राप्त होत असल्याचे सांगितले. तर त्यांनी शाळेसाठी 5 हजार रुपयाचे बक्षीस दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहिला कोकणे व जोया बागवान या विद्यार्थिनींनी केले. वरद लोखंडे या विद्यार्थ्याने आभार मानले.
दुपारच्या सत्रात झालेल्या संवत्सरी उत्सवाच्या कार्यक्रमास सीए अभयकुमार कटारिया अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी मनीषा अभयकुमार कटरिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सौ. मलमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत सादर केले. पर्युषणपर्व मध्ये उपवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संवत्सरी सणानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरण केले. तर एका सादरीकरणात जैन धर्माचे एकूण 24 तीर्थंकर यांचे दर्शन घडवून आणले. या विद्यार्थ्यांना स्मिता गांधी व अनिता वायकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सीए अभयकुमार कटारिया यांनी विद्यार्थ्यांचे कलागुणांचे कौतुक करुन शाळेला 5 हजार रुपयाचे बक्षीस दिले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा व खजिनदार प्रकाश गांधी यांनी उपस्थितांना संवत्सरी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
पर्युषण पर्व किंवा पर्युषण हा भारतातील जैन धर्मातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. पर्युषण म्हणजे भाद्रपद शुक्लपंचमीला या व्रताची सुरुवात होते. त्यालाच पर्वराज किंवा महापर्व असे म्हटले जाते. यावेळी क्षमा मागणे व अर्पण करणे हे वीरांचे भूषण आहे! असे भगवान महावीर यांनी आपल्या उपदेशात सांगितले असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियुषा तिवाडी व आदिती कोकाटे यांनी केले.
