वर्चस्व ग्रुप व प्रतापगड युवा प्रतिष्ठानचा उपक्रम
गणेशोत्सवात समाजाला एकत्र करुन धार्मिक व सामाजिक विचार पुढे घेऊन जाण्याची गरज -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवानिमित्त मंगल गेट येथे वर्चस्व ग्रुप व प्रतापगड युवा प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गणपतीची आरती करुन भडाऱ्याला प्रारंभ करण्यात आले. वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील नागरिक, व्यावसायिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, वर्चस्व ग्रुप व प्रतापगड युवा प्रतिष्ठान धार्मिक उपक्रमाने सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करत आहे. प्रत्येक सण-उत्सवात भंडाऱ्याचे आयोजन करुन भाविकांना तृप्त करण्याचे काम केले जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र करुन धार्मिक व सामाजिक विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. लोकमान्य टिळकांचा वारसा या ग्रुपच्या माध्यमातून जपला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुर्तडकर यांच्या पाठपुराव्याने मंगलगेट भागातील रस्त्याचे व इतर विकास कामे मार्गी लागले असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रुपच्या माध्यमातून गणेशोत्सवात पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत भाविकांसाठी विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम व भंडाऱ्याचे केले जाणारे आयोजनाचे त्यांनी कौतुक केले.
सागर मुर्तडकर यांनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मंगलगेटला भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. भाविकांसह सर्वसामान्य वर्गातील नागरिकांना देखील या भंडाऱ्याचा गणेशोत्सवात आधार मिळतो. प्रत्येक सण-उत्सवात भंडाऱ्याचे नियोजन करुन सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित परिसरातील भाविक, युवक व महिला वर्गाने पंगतीत बसून भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. विसर्जन मिरवणुकीतही वर्चस्व ग्रुप व प्रतापगड युवा प्रतिष्ठानच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन केले जाणार आहे.
