• Wed. Jul 2nd, 2025

लक्ष्मीमाता मंदिराच्या जीर्णोध्दार कामाच्या परवानगीसाठी वडगाव गुप्ता मध्ये उपोषण

ByMirror

Sep 1, 2024

अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानसह ग्रामस्थ व भाविकांची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता (ता. नगर) येथील लक्ष्मीमाता देवी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी सुरु करण्यात आलेल्या कामाला परवानगी मिळण्याच्या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव गुप्ता ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. तर शिववस्तीत असलेल्या पौराणिक काळातील मंदिराच्या कामाला तहसिलदार यांच्याकडून परवानगी मिळण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.


वडगाव गुप्ता (ता. नगर) येथे शिववस्ती येथ दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीचे पुरातन लक्ष्मीमाता मंदिर आहे. मंदिर लहान असल्याने व पडझड झाल्याने ग्रामस्थ व भाविकांनी त्याच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु केले आहे. देवीच्या स्थापनेची जागा पूर्वीपासून त्याच जागेवर असल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. ग्रामसभेत सदर मंदिराचे जिर्णोध्दार करण्याचे ठरविले आणि मंदिराचे भूमिपूजन 15 ऑगस्ट 2020 साली आसलेले तत्कालीन सरपंच विजयराव शेवाळे व प्रल्हाद भानुदास डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.


या मंदिराचा ओटा बांधण्यात आला आणि काही दिवसांनी पुढील बांधकामास प्रल्हाद भानुदास डोंगरे यांनी हरकत घेऊन काम बंद पाडले. हे काम सुरू होण्यासाठी तहसिलदार यांच्याकडून परवानगी मिळण्यासाठी भाविकांसह ग्रामस्थांनी उपोषण केले.

अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपोषणात पार्वतीबाई चांदणे, रावसाहेब चांदणे, जनाबाई चांदणे, नवनाथ चांदणे, सुनील सकट, विजय पाथरे, वंचित बहुजन आघाडी संजय शिंदे, नगर शहर वंचित बहुजन आघाडी प्रवीण ओरे, पिनू भोसले, बाळासाहेब मोरे, मंदाबाई चांदणे, छायाबाई चांदणे, शरद शिंदे, भाऊसाहेब शिंदे आदींसह समाज बांधव, भाविक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *