अर्ज भरणाऱ्या महिलांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी केली चर्चा
मनपाची यंत्रणा अजून प्रभावी करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना शहरातील महिला भगिनींना येणाऱ्या अडी-अडचणी सुटण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा क्षेत्र निहाय समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सदस्य प्रा. माणिक विधाते व प्रकाश भागानगरे यांनी मनपा उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे व तडवी यांची भेट घेऊन चर्चा केली. या योजनेचा लाभ महिलांना मिळण्यासाठी त्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्याकरिता मनपा प्रशासनाची यंत्रणा अजून प्रभावी करण्याची मागणी समितीच्या सदस्यांनी केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज महापालिका प्रशासनाकडून भरुन घेतले जात आहे. झोन ऑफिस व मनपा कार्यालयात स्वतंत्र्य कक्ष बनवून माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे सुरु आहे. मात्र ओटीपी न येणे, अर्ज पेन्डिंग असणे, वेबसाईटचे सर्व्हर डाऊन असणे, आवश्यक कागदपत्रांमधील त्रुटी आदी समस्यांचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे.
हा त्रास कमी होण्यासंदर्भात प्रा. माणिक विधाते व प्रकाश भागानगरे यांनी उपायुक्त मुंडे यांच्याशी चर्चा केली. सध्या अर्ज भरताना लाभार्थींना ओटीपी येणार नसून, अर्ज भरल्याचा मेसेज प्राप्त होणार असल्याची माहिती उपायुक्त मुंडे यांनी दिली. तर तातडीने संबंधित विभागाला महिलांच्या अडी-अडचणी सोडविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.