विश्व आदिवासी दिनानिमित्त उमेद सोशल फाउंडेशनचा उपक्रम
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- विश्व आदिवासी दिनानिमित्त उमेद सोशल फाउंडेशन, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी हॉस्पिटल व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने काळूची ठाकरवाडी (ता. पारनेर) येथील आदिवासी भागातील समाजबांधवांसह विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य नुरिल भोसले, वनकुटे गावचे सरपंच डॉ. नितीन रांधवण, फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, फाउंडेशनचे सचिव सचिन साळवी, सल्लागार दीपक धीवर, सामाजिक कार्यकर्ते भानुदास गागरे, पोपटराव मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य भिमराज गांगड, युवराज मधे, निवृत्ती मधे, पाराजी गांगड, भाऊसाहेब पारधे, संगीता गर्जे, आशा दुधवडे, जिजाबा दुधवडे, हेमराज दुधवडे, शामराव जाधव, आनंदा मधे, नामदेव जाधव, अलका मधे, ताराबाई मधे, राजेंद्र वारे, जिल्हा परिषद ठाकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव कदम, सहशिक्षक शौकत शेख, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर किरण वैराळ, किरण गर्जे, निखिल गायकवाड, सायली बरिदे, हर्षाली चौधरी, प्रिया कोडे आदींसह विद्यार्थी, शालेय शिक्षक व आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आले. प्रारंभी आदिवासी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याचे सादरीकरण करुन पाहुण्यांचे स्वागत केले. वनकुटे गावचे सरपंच डॉ. नितीन रांधवण यांनी आदिवासी समाजातील आरोग्याच्या प्रश्नाची गरज ओळखून फाऊंडशनच्या माध्यमातून घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे म्हणाले की, आदिवासी व दुर्लक्षीत समाजाला प्रवाहात आणण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे. शिक्षणाने समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणे शक्य होणार असून, यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा निर्माण करुन दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. फाउंडेशनचे उपाध्यक्ष कुणाल तनपुरे यांनी उमेद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. माजी प्राचार्य नुरिल भोसले यांनी फाऊंडेशनच्या दिशादर्शक सामाजिक कामाला शुभेच्छा दिल्या. आदिवासी समाजातील मुलांच्या चेहऱ्यावर नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शौकत शेख यांनी केले. आभार साहेबराव कदम यांनी मानले.