• Sun. Nov 2nd, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Aug 11, 2024

180 रुग्णांची मोफत दंत तपासणी व अल्पदरात होणार उपचार

आरोग्य सेवेतील सेवाभाव आनंदऋषीजी हॉस्पिटलने जपला -उत्तमचंद मंडलेचा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य सेवेतील सेवाभाव आनंदऋषीजी हॉस्पिटलने जपला आहे. येथे ओपीडी पासून ते मेडिकल पर्यंत रुग्णांना अल्पदरात आरोग्य सुविधा देण्याचे कार्य सुरु आहे. सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सुविधा घराघरात पोहचविण्याचे कार्य व आरोग्याबद्दल समाजात जागृती निर्माण करण्याचेही कार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे नातेवाईक असो किंवा नसो, रुग्णांच्या बेड पर्यंत औषध पोहचविण्याचे कार्य मेडिकलच्या माध्यमातून केले जात आहे. लहान आजारांपासून ते गंभीर आजारांवर एकाच छताखाली उपचार होत असल्याने सर्वसामान्यांसाठी हॉस्पिटलची भूमिका देवदूतासारखी झाली असल्याचे प्रतिपादन आनंदऋषीजी मेडिकलचे संचालक उत्तमचंद मंडलेचा यांनी केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त आनंदऋषीजी मेडिकल स्टाफ व पियुष मंडलेचा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित मोफत दंतरोग तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उत्तमचंद मंडलेचा बोलत होते. यावेळी स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे, पंकज नाबरिया, परेश मंडलेचा, प्रफुल भंडारी, प्रेरणा भळगट, साहिल अहमद, शिवानी जगताप, दिव्या कळमदाने, साक्षी पवार, अमित कटारिया, दानिश शेख, मयुरी पाचारणे, विशाखा गुंदेचा, शादाब शेख, पोपटलाल लोढा, संतोष बोथरा, सतीश (बाबूशेठ) लोढा, माणकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, डॉ. अर्पणा पवार, डॉ. कोमल ठाणगे, डॉ. प्राची गांधी, डॉ. प्रणव डुंगरवाल, डॉ. स्वराज ठोले, डॉ. अभिषेक मुळे आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल फक्त नगर जिल्ह्यापुरते मर्यादीत राहिले नसून, शेजारील जिल्हे व राज्यातील इतर ठिकाणाहूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. तज्ञ डॉक्टर, अनुभवी स्टाफ व अद्यावत यंत्र सामुग्रीने दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे कार्य सुरु आहे. डेंटल विभागात असलेली डेंटल इम्पांट व इतर खर्चिक आरोग्य सुविधा रुग्णांना अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर आरोग्य सुविधा दिली जात आहे. पुढील महिन्यात डेंटल विभागावर लक्ष केंद्रित करुन अद्यावत सेवेने एक हजार रुग्णांचा टप्पा गाठला जाणार आहे. दात हे शरीरातील छोटे भाग असून, ते दुखले तर संपूर्ण शरीर व्याधीने त्रस्त होतो. पैसे असो किंवा नसो, रुग्णांना दंत विकारावर उत्तम सेवा या हॉस्पिटलमध्ये दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय गुगळे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मेडिकलने देखील सेवाभाव जपला आहे. आर्थिक सुबत्तेपेक्षा सेवाभाव महत्त्वाचा आहे. दातांचे विकार लहान असले तरी, मोठ्या प्रमाणात पैसे लागतात. सर्वसामान्य वर्गाला हा खर्च पेलवत नाही. मंडलेचा परिवाराने दंत विकारावर घेतलेला शिबिर सर्वसामान्यांसाठी आधार ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. अपर्णा पवार यांनी जेंव्हा आपण हासू, तेंव्हा आयुष्य आनंदी बनते. उत्तम हास्यासाठी उत्तम दातांची निगा राखणे आवश्‍यक आहे. दात हे खराब होऊ नये यासाठी काळजी घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. या दंत विभागात तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने गरजूंना अद्यावत सुपर स्पेशलिटी आरोग्य सेवा मिळत असून, अत्यल्प दरात रुग्णांना दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार पध्दतीची सेवा मिळत आहे. दर शनिवारी दंत रोग विभागाची ओपीडीची मोफत व इतर वेळेस सवलत दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. प्रणव डुंगरवाल यांनी बालकांच्या दंत विकाराकडे निष्काळजीपणा करुन चालणार नसून, त्यांचे सध्याच्या दातांचा परिणाम भविष्यात येणाऱ्या कायम स्वरुपी दातांवर होत असतो, यासाठी काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
पियुष मंडलेचा यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये सेवीची संधी म्हणूनच प्रत्येक कर्मचारी योगदान देत आहे. प्रत्येक औषधावर सवलत देऊन रुग्णांना ती अल्पदरात उपलब्ध करुन देण्याचे कार्य सुरु असल्याचे सांगितले. प्रेरणा भळगट यांनी आनंदऋषीजी मेडिकलद्वारे सुरु असलेल्या सेवा कार्याची माहिती दिली.


संजय जाधव या रुग्णाने चांगली सेवा व उत्तम सल्ला देण्याचे कार्य हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर मंडळी करत आहे. फक्त शारीरिक व्याधी नव्हे, तर मनातील वेदना देखील दूर करण्याचे काम या हॉस्पिटलमधून होत आहे. समाजातील गोर-गरीबांच्या मुखात विविध आजारांवर उपचारासाठी एकमेव आनंदऋषीजी हॉस्पिटल नाव असल्याची मनातील भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.



दंतरोग तपासणी शिबिरात 180 रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. दंतरोग तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची दंत तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरातील गरजूंची ओरल सर्जन, जबड्याचा फ्रॅक्चर इम्लांट बसविणे, अक्कल दाढ काढणे, वेडेवाकडे दात सरळ करणे आदी उपचार करणार आहेत. तसेच लहान मुलांचे दात काढणे, सिमेंट बसवणे, रूट कॅनल करणे आदी उपचार अल्पदरात केले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *