डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त पुरस्काराने होणार सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका प्रमिला बाबासाहेब झावरे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनानिमित्त सहावे राज्यस्तरीय काव्य संमेलन रंगणार असून, यामध्ये मान्यवरांच्या हस्ते झावरे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
प्रमिला झावरे या मागील 22 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देऊन विद्यार्थी घडवित आहे. त्या टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) या गावातील असून, सध्या धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना ते नेहमीच मदत करत असतात. तसेच त्यांचे सामाजिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रातही कार्य सुरु असून, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.