निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने बांधकाम कामगारांमध्ये नाराजी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडे (संच) मंजूर होऊनही त्याचे वाटप केले जात नसल्याने अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकामगार संघटनेच्या वतीने बंगालचौकी येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मंगळवारी (दि.6 ऑगस्ट) उपोषण करण्यात आले.
संघटनेचे सरचिटणीस नंदू डहाणे यांनी सुरु केलेल्या उपोषणास क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा यांनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला. यावेळी अशोक बेरड व इतर बांधकाम कामगार उपोषणात सहभागी झाले होते.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांडे वाटप नियोजनाच्या बैठकीत 31 मे पूर्वीच्या नोंदणीकृत कामगारांना भांडे वाटप करण्याचे ठरलेले आहे. मात्र या निर्णयाची अद्यापि अंमलबजावणी झालेली नाही. या मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
31 मे पूर्वी नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना प्राधान्याने गृहपयोगी भांडे (संच) वाटप करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.