• Sat. Mar 15th, 2025

मानवसेवा प्रकल्पात जागतिक मानवी तस्करी विरुद्ध दिवस साजरा

ByMirror

Aug 4, 2024

मानवी तस्करी प्रतिबंधासाठी केली जागृती

मानवी तस्करी रोखण्यासाठी अमृतवाहिनी सारख्या स्वयंसेवी संस्थेची गरज -रामचंद्र पालवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सक्तीचे श्रम, लैंगिक गुलामगिरी किंवा व्यावसायिक शोषणाच्या उद्देशाने माणसाचा होणार व्यापार म्हणजे मानवी तस्करी होय. पूर्वी परदेशात मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात चालत होती, परंतु मागील काही दशकापासून आपल्या देशात, राज्यात आणि जिल्ह्यात तस्करीचे प्रमाण वाढत चालले आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी अमृतवाहिनी सारख्या स्वयंसेवी संस्थेची गरज असल्याची भावना नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र पालवे यांनी केले.


श्री अमृतवहिनी ग्रामविकास मंडळाच्या अरणगाव रोड येथील मानवसेवा प्रकल्पात जागतिक मानवी तस्करी विरुद्ध दिवस साजरा करण्यात आला. 30 जुलै हा दिवस जागतिक मानवी तस्करी विरुद्ध दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाळला जातो. मानवी तस्करी विरोधात काम करणाऱ्या श्री अमृतवहिनी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक पालवे बोलत होते.


पुढे पोलीस उपनिरीक्षक पालवे म्हणाले की, विशेषत: आपल्या राज्यात व्यावसायिक शोषणाच्या उद्देशाने माणसांची होणारी तस्करी मोठ्या प्रमाणात आढळून येते. ही तस्करी थांबविण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी खरात यांनी समाजात मानवी तस्करी बद्दल जनजागृती करणे, समाजात कुठेही तस्करी सारखे प्रकार आढळल्यास अमृतवाहिनी सारख्या संस्थेशी किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क करण्याचे त्यांनी आवाहन केले. सहाय्यक सरकारी वकील ॲड. वैभव बागुल यांनी मानवी तस्करी बाबत कायदे विषयक व गुन्ह्यांबाबत माहिती दिली. तर जिल्हा विधी प्राधिकरणचे ॲड. मच्छिंद्र देठे यांनी गरजू, गरीब व्यक्तींना कायदेविषयक मदतीची आवश्‍यकता असेल तर त्यांनी जिल्हा विधी प्राधिकरणाशी संपर्क करण्याचे सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वडाने यांनी संस्थेच्या सामाजिक कार्यास नेहमीच सहकार्य राहणार असल्याची भूमिका विशद केली.


श्री अमृतवहिनी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख यांनी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे जागरूकता वाढवणे, प्रकरणे नोंदवणे, पुनर्वसन कार्यक्रमांना समर्थन देणे आणि असुरक्षित समुदायांना सक्षम बनवणे हा असून, मानवी तस्करी, बालकामगार तसेच वेठबिगार प्रणाली निर्मूलनासाठी असल्याचे स्पष्ट केले. मंगेश थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा उपक्रम श्री अमृतवहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास गुंजाळ, मंगेश थोरात, सागर विटकर, ऋतिक बर्डे, पूजा मुठे, प्रशांत जाधव, राहुल साबळे, मथुरा जाधव, प्रसाद माळी, विकी सुरवडकर, रावसाहेब भालके यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *