• Fri. Mar 14th, 2025

शहरातील आंबेडकरी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश

ByMirror

Aug 3, 2024

लातूरच्या आश्रम शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या हत्येचा निषेध

आरोपी असलेल्या शिक्षकाला त्वरीत अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील आश्रम शाळेत मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालया समोर शुक्रवारी (दि.2 ऑगस्ट) आक्रोश व्यक्त करुन या घटनेतील आरोपी असलेल्या शिक्षकाला त्वरीत अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तीव्र निदर्शने करुन मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय, सामाजिक व पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लातूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेत मागासवर्गीय कुटुंबातील अरविंद खोपे हा विद्यार्थी इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील यांनी मुलाची परीक्षा असल्यामुळे पांगरी (ता. परळी, जि. बीड) येथून त्याला लातूरच्या सदर आश्रम शाळेत शिक्षण घेण्यासाठी सोडले. 29 जुलै रोजी अरविंदच्या आई-वडिलांना आश्रम शाळेतील शिक्षकांनी फोन करुन त्याच्या पोटाला काहीतरी लागले असल्याचे सांगितले.

त्याचे आई-वडील लांब असल्यामुळे त्यांनी त्या भागात जवळ असणाऱ्या नातेवाईकांना फोन करून आश्रम शाळेत पाठविले. नातेवाईक अरविंदला पाहण्यासाठी गेले असता, त्या शिक्षकाने तो आश्रमातून पळून गेलेला असून, त्याचा शोध घेण्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे आई-वडिल व नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु 30 जुलै रोजी पहाटे 3 वाजता आश्रम शाळेचा तोच शिक्षक गुपचूप अरविंदचा मृतदेह जंगलात टाकण्यास निघाला असताना अरविंदच्या नातेवाईकने त्या शिक्षकाला पकडले, त्या शिक्षकाने तेथून पळ काढला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या प्रकरणात त्या मागसवर्गीय विद्यार्थ्याचा मारेकरी तो शिक्षकच असून, त्या मुलाची हत्या त्या शिक्षकाने केली असल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता नाकरता येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मागासवर्गीय खोपे कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची चौकशी व्हावी, पसार झालेल्या शिक्षकाला तातडीने अटक व्हावी, शासनाकडून मयत मुलाच्या कुटुंबीयांना 25 लाखाची आर्थिक मदत मिळावी, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *