अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
अन्यथा स्वातंत्र्यदिनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी पतसंस्था कान्हूर पठारच्या फसवणूक प्रकरणातील मोकाट असलेल्या आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी रणजीत पाचारणे, पोपट ढवळे व संभाजी भालेकर यांना जाणीवपूर्वक अटक केली जात नसल्याने स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी पतसंस्था कान्हूर पठार मध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी 3 एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यातील आरोपी अटक होत नसल्याने समितीच्या वतीने 20 मे रोजी कार्यालयात उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. परंतु फक्त त्यातील आजाद ठुबे यांना अटक करण्यात आली आहे. बाकीचे आरोपी रणजीत पाचारणे, पोपट ढवळे व संभाजी भालेकर यांना जाणीवपूर्वक अटक केली जात नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
यामधील आरोपी पोपट ढवळे आर्थिक प्रबळ असून त्यांनी पारनेर तालुक्यातील अनेक पतसंस्थेत घोटाळे करून त्या पतसंस्थांना अडचणीत आणले आहे. उलट अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक करणे गरजेचे असताना देखील सदरचे गुन्हेगार जिल्ह्यात मोकाट फिरताना दिसत आहे. सदर आरोपींना अटक न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.