युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम
मौखिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालेले दंत रोगाच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करुन मौखिक आरोग्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बुऱ्हाणनगर येथील अली पब्लिक स्कूल येथे हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचे व्हाईस चेअरमन महेबुब शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी अली पब्लिक स्कूलचे प्राचार्य अन्जर खान, अली खान, डॉ. स्वालिहा बागवान, डॉ. वैष्णवी गोरे, मुस्तफा शेख, प्रेरणा केरुळकर आदींसह शालेय विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

डॉ. स्वालिहा बागवान म्हणाल्या की, फास्टफुड व सतत चॉकलेट खाण्याने लहान मुलांमध्ये दातांचे विकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. योग्यवेळी मार्गदर्शन व उपचार न मिळाल्यास ते दात गमवण्याची वेळ येते. आपल्या दातांची देखील निगा राखणे आवश्यक आहे. दंत विकार सुरु झाल्यावर नागरिक डॉक्टरांकडे धाव घेतात. दातांची नियमित तपासणी करणे आवश्यक असून, ते उत्तम राहण्यासाठी काळजी घेणे हा उत्तम पर्याय असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना दातांची निगा राखण्यासाठी मार्गदर्शन केले.
महेबुब शेख म्हणाले की, मुलांमध्ये दातांचे विकार ही समस्या वाढत आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण झाल्यास दातांची निगा योग्य प्रकारे राखून या समस्या कमी करता येणार आहे. त्या दृष्टीकोनाने युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टने उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य अन्जर खान यांनी वेळ अभावी व महागड्या आरोग्य सुविधांमुळे सर्वसामान्यांना वेळोवेळी दातांचे उपचार करणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असून, याद्वारे विद्यार्थी दंत विकारापासून सुटका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.