विद्यार्थ्यांनी केला विठ्ठलनामाचा गजर
दिंडीतून पाण्याची बचत व वसुंधरा वाचवाचा संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद लुटला. शाळेत बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा रंगला होता. दिंडीने शाळेत उत्साहापूर्ण व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमांचे पूजन करून दिंडीतील पालखी सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या गजरात ठेका धरत पाण्याचे महत्तव सांगत पाणी बचत व वसुंधरा वाचवा असा संदेश सांस्कृतिक कार्यक्रमातून दिला. खांदी भगवी पताका घेऊन मुखी विठ्ठल नामाचा गजर करत रिंगण करण्यात आले होते. फुगडी घालत विद्यार्थ्यांनी दिंडीचा अनुभव घेतला.

यावेळी इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी दास्यभक्ती शेलार हिने एकादशीचे महत्त्व सांगितले. भावना देशमुख हिने कविता, अंकिता काळे हिने भारुड व श्रेया उंडे हिने कीर्तन करत विठ्ठल नामाने शालेय परिसर दणाणून सोडला. शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप म्हणाले की, आपल्या जीवनातील कर्म व कार्य सगळ्यात महत्त्वाचे आहे. जसे विठ्ठलासाठी सर्व लोक समान असतात त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जीवनामध्ये समतेचे तत्व अंगीकारा व त्यातून समानतेचा धडा घ्या. दिंडी मधून लाखो लोक शिस्तीचे पालन करतात, त्यातून शिस्तीचे धडे गिरवा.
जीवनात सन्मानाने जगण्यासाठी चांगले आचार विचार अंगीकारा. जीवनात ध्येय ठरवून त्याप्रमाणे काम करा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी श्लोक लहाटे व देवश्री घुले यांनी केले. अवंती घोरपडे या विद्यार्थिनीने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.