भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 च्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. सुरु झालेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाची पाहणी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, भिंगार राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष शिवम भंडारी, दिपक राहिंज, दिपक लिपाणे, उद्धव शिंदे, दिनेश लंगोटे, सागर चवंडके, अभिजीत सपकाळ, नूर शेख, गणेश ताठे आदी उपस्थित होते.
भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 ची अत्यंत दुरावस्था झाल्याने खड्डेमय रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात लहान-मोठे अपघात घडत आहे. पावसाळ्यात यामध्ये आनखी भर पडून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या प्रश्नी भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन रोड येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास भेट देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
राष्ट्रवादी युवकच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन शुक्रवारी (दि.19 जुलै) रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर रस्त्याची पॅचिंग चांगल्या पध्दतीने होण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या.