मुंबईच्या आंदोलनात नगरमधील कार्यकर्त्यांनी उचलला होता खारीचा वाटा
अहमदनगर (प्रतिनिधी)- महायुती सरकारने अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापनेचा आद्यादेश काढल्याबद्दल शहरातील मातंग समाजाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन महायुती सरकारचे आभार मानण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शासनाचा पुरस्कार प्राप्त सुनिल सकट, अनिल वाघचौरे, सुनिल कान्हू उमाप, संदीप पवार, मिराताई सरोदे, सुनिता उल्हारे, अशोक भोसले, नारायण साठे, नामदेव चांदणे, बापूसाहेब गायकवाड, सत्यवान नवगीरे, सुरेश साठे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

सकल मातंग समाजाच्या वतीने 2 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर जवाब दो आंदोलन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला यश आले आहे.
या आंदोलनात नगर मधून सामाजिक कार्यकर्ते तथा शासनाचा पुरस्कार प्राप्त सुनिल सकट, मधुकर पठारे, उमेश साठे, ना.म. साठे, कांतीलाल जगधने, विजय वडागळे, भगवान मिसाळ, भगवान जगताप, भगवानराव गोरखे, सचिन भारस्कर, नामदेव चांदणे, डॉ. सुनिल पवार, रावसाहेब पवळे, मंगेश वडागळे, सुनिल शिंदे, मनिष वैराळ, अविनाश उमाप, अशोक शिंदे आदींनी सक्रिय सहभाग नोंदवून ह्या सामाजिक लढ्यासाठी खारीचा वाटा उचलला होता.
आर्टीच्या स्थापनेने महाराष्ट्रातील मातंग समाजात आनंदाचे वातावरण असून, यामुळे मातंग समाजातील मुलांना उच्च शिक्षित होण्यासाठी आधार मिळणार आहे. तर परदेशातही त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असल्याची भावना सुनिल सकट यांनी व्यक्त केली. अहमदनगर मधील मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले आहे.
