अनेक पुरस्कार प्राप्त या काव्य संग्रहातून आईच्या आठवणीने डोळे पाणवते!
(पुस्तक परीक्षण)
अनन्यता या काव्यसंग्रहाला मानवतेचा वास, संस्कृतीचा साज आणि ममतेची आस आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला वाढविण्यात मातेचे मोठे योगदान असते. आयुष्यभर मातेच्या प्रती कृतज्ञता भाव आपल्या प्रत्येकाच्या अंत:करणात असतो. फुलांनी भरलेली मालती जरी झाकून ठेवली तरी तिचा सुगंध दरवळतो.
असा हा अनन्यता काव्यसंग्रह सामाजिक कार्यकर्त्या सरोज प्रभाकर आल्हाट यांनी लिहिलेला आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हणतात. कारण आई ही मुलांची पहिली गुरु, आईमुळेच आपण हे जग पाहू शकलो, म्हणून या 50 कविता त्यांनी आई बद्दल लिहिलेल्या आहेत. प्रत्येक कविता आशयपूर्ण असून. आई, मावशी आणि स्वतः या तीन नात्यावर हा काव्यसंग्रह आधारलेला आहे. घरात आई नसल्या नंतर मुलांची काय अवस्था होते, हे या काव्य संग्रहातून प्रतिबिंबित होते. आई आणि मुलगी यांना जोडणारा हा काव्यसंग्रह आहे. जीवनाच्या वळणावर ही आईच मैत्रीण सुद्धा बनते. तुझी रिकामी खाट, हाक मारते रोजच या कवितेतून आई बद्दल असणारा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, माया, ममता आपणाला दिसते. म्हणून हा भावनिक व आईचे जीवनातील महत्त्व जाणणारा उत्कृष्ट काव्यसंग्रह आहे.
हे लिहिताना डोळ्यातून अश्रू येतात. खरोखरच आईच्या नंतर आपले जग पोरकेपणाचे होते. हे या काव्य संग्रहातून सिद्ध होते. वयात येताना छोट्याशा कान गोष्टी आई आपल्या लेकीला कसे वागावे? कसे राहावे? तू आता मोठी झाली हे सांगून सक्षम महिला बनविले आहे. कवयित्री पुढे म्हणतात अल्बम चाळताना तुझ्या मोहक सौंदर्याची भुरळ पडलेलं प्रत्येक पान या काव्यातून गतकाळ आठवतो, ती आपले नाते सांगते. तुझे सौंदर्य किती छान होते, म्हणून हा काव्यसंग्रह साहित्यिकाच्या मनाला भावतो, पुन्हा पुन्हा वाचन करावे असे अर्थपूर्ण यमक आहेत.
चिखल भरल्या डोहातही तोल सांभाळणारी माझी माय …..खरोखरच होती, आज बऱ्याच जणांना तोल आणि तोंड सांभाळता येत नाही. पण कवयित्रीची आई दोन्ही सांभाळत होती, म्हणून या काव्यसंग्रहातून आईच्या आठवणी तिने केलेले संस्कार, दिलेली माया, ममता,आपुलकी, वात्सल्य जीवात जीव असे पर्यंत विसरू शकणार नाही. आई म्हणजे सात्विकता, प्रीती, मधुमालती, दुधावरची साय, स्पर्शबिंदू असे नाना शब्द काव्यसंग्रहात दिलेली आहेत.
ना चिठ्ठी ना कोई सन्देश,
जाने वो कौन सा देश!
जहाँ तुम चले गऐ,
इस दिल पे लगा के ठेस!… या गीताप्रमाणे कवयित्रीला आपल्या आईचे दुःख सहन होत नाही. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांना आठवले साहित्य पुरस्कार, बाबा पद्मजी पुरस्कार, स्वानंद काव्य पुरस्कार, राष्ट्र मित्र पुरस्कार, युवा पुरस्कार ,अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला पुरस्कार कवियत्री शांता शेळके पुरस्कार, शिवछत्रपती प्रेरणा समाज रत्न पुरस्कार, आयडॉल महाराष्ट्र पुरस्कारांनी गौरवलेली आहे.
त्यांचा पिंड हा समाज सेवेसाठीच जणू काही तयार झाला असून, दलित, वंचित, पीडित, शोषित, आदिवासी, बालकल्याण परिचय, आरोग्य समस्या, वीटभट्टी, कुष्ठरोगी, ऊसतोड कामगार, एड्सग्रस्त आदी घटकासाठी समाजाभिमुख विकासात्मक कार्य त्यांच्या हातून तीस वर्षापासून अविरतपणे सुरु आहे. पुणे, अहमदनगर येथून आकाशवाणी वरून मुलाखती प्रबोधन पर व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या अनन्यता हा काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. म्हणून हा काव्यसंग्रह सर्वांनी वाचन करावा ही अपेक्षा.
असा हा काव्यसंग्रह आईच्या अस्तित्वाचा ठाव घेतो. प्रा.डॉ.मिलिंद कसबे यांची अभ्यास पूर्ण बहारदार प्रस्तावना लाभली आहे. प्रकाशक श्री जगदीश नरसिंघानी, नाशिक यांनी हा प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे तर मुद्रण दी लेप्रसी मिशन, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, हिरावाडी रोड कॉर्नर जुना आडगांव नाका, पंचवटी, नाशिक यांनी केले आहे. विशेष म्हणजे समाजातील दीन, दुबळ्या, वंचित, अनाथ दुर्बल घटक या सर्वांना मोफत देण्यासाठी हा काव्यसंग्रह छपाई केलेला आहे. ही गोष्ट मनाचे औदार्य दाखवणारी आहे.
- पुस्तक परीक्षण- प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव (अध्यक्ष, विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि.नांदेड मो. 9921208563)
