स्मार्ट प्रीपेड मीटरला समाजवादी पार्टीचा विरोध; सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध दर्शवून ही नवीन स्मार्ट मीटर जोडणीची कार्यवाही त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने शहरातील विद्युत महावितरण कार्यालया समोर गुरुवारी (दि.4 जुलै) निदर्शने करण्यात आली. विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेशकुमार पवार यांना निवेदनाद्वारे सध्याचे मीटर तशाच स्थितीत चालू ठेऊन स्मार्ट प्रीपेडची ग्राहकांना सक्ती करु नये, या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन, अजहर पैलवान, अकबर पैलवान, गनी राजमोहम्मद, अल्ताफ लक्कडवाला, इक्राम तांबटकर, जुबेर शेख, तन्वीर बागवान, जहीर काजी, समीर बिल्डर, मतीन सय्यद, जावेद शेख आदी उपस्थित होते.

महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असे जाहीर केले आहे. हे मीटर कंपनीच्या खर्चाने मोफत लावणारा अशी फसवी जाहिरात केली जात आहे. संबंधित टेंडर्स मंजूर करण्यात आले आहे. लवकरच सर्वत्र हे मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होणार आहे. वास्तविक हे मीटर मोफत लावले जाणार नसून, केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित खर्च 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाणार असल्याचा दावा समाजवादीच्या वतीने करण्यात आला आहे.
महावितरण कंपनी खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणलेली आहे. 300 युनिटचे आत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य छोट्या, घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांना या मीटरचा काही उपयोग नाही व गरजही नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांकडूनही स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
वीज कायदा 2003 मधील अधिनियम क्रमांक 47 (5) अन्वये कोणता मीटर वापरायचा आहे? याबाबत मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क व अधिकार संबंधित वीज ग्राहकांना आहे. कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या या हक्काचे कायदेशीर उल्लंघन करीत असल्याचे स्पष्ट करुन, स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती न करता सध्याचे सुरु असलेले मीटरच कार्यान्वीत ठेवण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.