• Wed. Jul 2nd, 2025

शहरात कै. गुरुवर्य बत्तिन यांची जयंती साजरी

ByMirror

Jun 21, 2024

कै. गुरुवर्य बत्तिन यांच्या कर्तृत्वाने समाजाच्या प्रगतीला गती मिळाली -प्रा. बाळकृष्ण सिद्दम

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. गुरुवर्य बत्तिन यांची 136 वी जयंती प्रा. बत्तिन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयात साजरी करण्यात आली. कै.प्रा.बत्तिन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.बाळकृष्ण सिद्दम, प्रा.वीरभद्र बत्तिन, बत्तिन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर मंगलारम, सचिव प्रा. बाळकृष्ण गोटीपामुल, सदस्य रघुनाथ गाजेंगी, कुमार आडेप, शिवाजी संदुपटला, शेखर दिकोंडा, माध्यमिकचे प्राचार्य संदिप छिंदम, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल, रावसाहेब इंगळे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल म्हणाले की, कै. गुरुवर्य बत्तिन यांनी समाजसेवचे व्रत घेऊन शिक्षणाने समाजाला प्रकाशवाट दाखवली. निवृत्तीनंतर आपल्या भविष्यानिर्वाह निधीची सर्व रक्कम पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाला शैक्षणिक कार्यासाठी देणारे पोट्यन्ना बत्तिन हे सर्व समाजासमोर आदर्श व्यक्ती ठरल्याचे स्पष्ट केले. उपशिक्षक रावसाहेब इंगळे यांनी आपल्या भाषणात गुरुवर्य बत्तिन यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.


प्रा. बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, कै. गुरुवर्य बत्तिन यांच्या कर्तृत्वाने समाजाच्या प्रगतीला गती मिळाली. पद्मशाली समाजाला संघटित करुन जागृत केले व त्यांच्यात शिक्षणाची मशाल प्रज्वलीत केली. ज्ञानाची शिखरे गाठून देखील साधेपणाने राहणारा हा माणूस होता. त्यांचे कर्तृत्व व विचार आजही समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. वीरभद्र बत्तिन यांनी सर्व कुटुंब आजही गुरुवर्य बत्तिन यांच्या विचाराने वाटचाल करुन सामाजिक योगदान देत असल्याचे स्पष्ट केले. उपशिक्षिका शोभा बडगू यांनी आभार मानले. गुरुवर्य बत्तिन पोट्यन्ना शैक्षणिक, सामाजिक मंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *