• Sun. Nov 2nd, 2025

वैदुवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByMirror

Jun 19, 2024

गरजूंच्या शिक्षणासाठी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा पुढाकार

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सावेडी, वैदुवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रुपच्या सदस्या माया राजहंस व लता डेंगळे यांनी पुढाकार घेऊन मुलांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.


नगरसेवक मनोज दुल्लम व माजी नगरसेविका सोनाबाई तायगा शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, सावेडी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा कुसुम सिंग, उपाध्यक्ष कविता दरंदले, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उषा सोनी, मायाताई कोल्हे, वंदना गोसावी, सुरेखा बारस्कर, शोभाताई भालसिंग, सुजाता पुजारी, मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे, मुख्याध्यापिका मीनाक्षी जाधव, माया राजहंस, रजनी भंडारी, लीला अग्रवाल, जीवनलता पोखरणा, हिरा शहापुरे, जयश्री पुरोहित, नागेश शिंदे, सुरेखा लोखंडे आदींसह महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मनोज दुल्लम म्हणाले की, गरजू घटकातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने राबविण्यात आलेला उपक्रम दिशादर्शक आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या उपक्रमातून भावी सक्षम पिढी घडणार असून, मुलांच्या जीवनात शिक्षण घेण्याची उमेद निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


जयाताई गायकवाड म्हणाल्या की, प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून योगदान द्यावे. ग्रुपच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासह विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन त्यांना आधार देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लता डेंगळे यांनी अभिजीत डेंगळे या विद्यार्थ्याच्या स्मृती प्रित्यर्थ मागील 34 वर्षापासून दरवर्षी डेंगळे परिवाराच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली जात असल्याची माहिती दिली. नवीन वह्या व गरजेचे विविध शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *