• Fri. Mar 14th, 2025

राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या अपहारातील आरोपींना अटक व्हावी

ByMirror

May 28, 2024

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालया समोर उपोषणाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 10 जून नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी दिला आहे.


कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनला 3 एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला असून, यामधील मुख्य आरोपी पोपट ढवळे, आझाद ठुबे व संभाजी भालेकर यांना अद्यापि अटक करण्यात आलेली नाही. या पतसंस्थेत अपहाराची व्याप्ती मोठी असून, यामध्ये इतर संचालक मंडळही दोषी आहे. पतसंस्थेचा अपहार उघडकीस येण्यासाठी त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडून करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


या पतसंस्थेत सहकार अधिनियमांचे उल्लंघन करून अनियमितता करण्यात आली आहे. पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे. या अपहाराची रक्कम 50 लाखापेक्षा अधिक आहे. गेल्या तीन वर्षापासून तक्रारीचा पाठपुरावा करून आज अखेर चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्तींनी आपल्या जीवनाची पुंजी पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवली होती. गेल्या दीड वर्षापासून हेलपाटे मारून देखील ठेवीदारांना ठेवी मिळालेल्या नाहीत. काही ठेवीदारांनी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

या पंतसंस्थेच्या गैरव्यवहारात आरोपी असलेल्या पोपट ढवळे याने पारनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात असणाऱ्या पतसंस्था व मल्टीस्टेट संस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणीत आणले आहे. तर आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी पोपट ढवळे, आझाद ठुबे व संभाजी भालेकर यांना तात्काळ अटक व्हावी, ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी नगर अर्बन बँकेप्रमाणे कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *