फिनिक्स सोशल फाऊंडेशनने भरले नागरिकांचे संकल्प अर्ज
शरीर हे नश्वर असून, मरणोत्तर अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलणार -जालिंदर बोरुडे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातील सिध्दीबाग येथील बुध्द विहारातील भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाची जागृती करण्यात आली.
मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाचे महत्त्व विशद करुन नागरिकांना संकल्प अर्जाचे वाटप करण्यात आले. यावेळी फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, भारतीय बौध्द महासभेचे प्रा. राम गायकवाड, उमेश मोरे, निलेश जाधव, नलिनी गायकवाड, अण्णासाहेब गायकवाड, अर्चना गायकवाड, वैशाली खंदारे, रजनी ताठे, आशाताई गायकवाड आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, भगवान बुध्दांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणी, संदेश आणि विचार मानवाला यशस्वी व समाधानी जीवनाचा मार्ग दाखवित आहे. त्यांनी मानवतेची शिकवण देऊन, समाजातील हिंसा, अशांती, अंधविश्वास आणि अधर्म दूर करण्याचे कार्य केले.
आज त्यांची प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान होत नसल्याने अनेक रुग्ण नेत्र व अवयवाच्या प्रतिक्षेत आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने सात व्यक्तींना जीवदान मिळते. शरीर हे नश्वर असून, मरणोत्तर अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांचे नेत्रदान व अवयवदानाचे संकल्प अर्ज भरुन घेण्यात आले.
