• Mon. Jan 26th, 2026

केडगावमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणकची रंगली शोभायात्रा

ByMirror

Apr 24, 2024

जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा लेझीम पथकाने वेधले लक्ष

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहिंसा परमो धर्म:ची शिकवण देऊन संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा उपदेश करणारे भगवान महावीर स्वामींचा जन्मकल्याणक (जयंती) केडगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुदेव युवा मंचच्या वतीने केडगाव परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले.


शोभायात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथकासह डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले-मुली, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले पुरुष, केसरी, लाल साड्या परिधान केलेल्या महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या शोभायात्रेचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. शोभा यात्रेच्या अग्रभागी भगवान महावीर स्वामींची प्रतिमा असलेले रथ होते. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने विविध डाव सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्रिशलानंदन वीर की, जय बोलो महावीर की… अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.


भूषणनगर ताराबाग कॉलनी येथून शोभा यात्रेचे प्रारंभ झाले. नगर-पुणे रोड मार्गे केडगाव बस स्थानक, अंबिका बस स्थानक येथून मार्गक्रमण होऊन पाच गोडाऊन जवळील केडगाव जैन धर्मस्थानक येथे शोभा यात्रेचा समारोप झाला. यावेळी साध्वी नवीन ज्योतीजी म.सा. यांनी भगवान महावीर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.


कार्यक्रमास सचिन (आबा) कोतकर यांनी भेट देवून सर्व भाविकांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व केडगाव जैन धर्मस्थानक परिसरात संदिप उद्योग समुहाच्या माध्यमातून पेव्हिंग ब्लॉग बसवून सुशोभिकरण करण्याचे आश्‍वासन दिले.

मुलांनी नाटिकेतून भगवान महावीर यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी दिलेली शिकवण सांगितली. महिलांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी उपस्थितांनी आपले विचार मांडले. भाविकांसाठी गौतम प्रसादीचे नियोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *